CoronaVirus in Nagpur : धारावी येथून दहेगावात पोहचला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 11:34 PM2020-05-23T23:34:05+5:302020-05-23T23:41:20+5:30
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईच्या धारावी येथून कोरोनाचा विषाणू नागपूरजवळील कोरोडी रोडवरील दहेगाव (रंगारी) येथे पोहचला. २५ वर्षीय पॉझिटिव्ह आलेला हा रुग्ण एका ट्रकमध्ये लपून आपल्या गावी आला. परंतु घरच्यांनी प्रवेश नाकारल्याने मेयोत दाखल झाला. या रुग्णासह पहिल्यांदाच बुटीबोरी येथेही दोन रुग्णाची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईच्या धारावी येथून कोरोनाचा विषाणू नागपूरजवळील कोरोडी रोडवरील दहेगाव (रंगारी) येथे पोहचला. २५ वर्षीय पॉझिटिव्ह आलेला हा रुग्ण एका ट्रकमध्ये लपून आपल्या गावी आला. परंतु घरच्यांनी प्रवेश नाकारल्याने मेयोत दाखल झाला. या रुग्णासह पहिल्यांदाच बुटीबोरी येथेही दोन रुग्णाची नोंद झाली. हे बापलेक असून मुलगा मुंबईवरून आला होता. तर प्रथमच उत्तर नागपुरातील टेका येथील एका गर्भवतीची नोंद झाली. या तिन्ही वसाहती कोरोनासाठी नव्या असल्याने व सीए रोडवरील एका भिकाऱ्याचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज सहा रुग्णांची नोंद होऊन रुग्णांची संख्या ४१६ वर पोहचली आहे. धारावी येथील एका सलूनमध्ये काम करणारा हा युवक १७ मे रोजी गावी पोहचला. दहेगाव येथून पांजार स्थित मॉडर्न स्कूल परिसरात राहणाऱ्या कुणा ओळखीच्या घरी गेला. येथे आठ लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. या युवकाच्या संदर्भात कोराडी ठाण्यात पोलीस हेल्पलाईन नंबरवरून सूचना देण्यात आली होती. परंतु कुणी सहकार्य केले नाही. यामुळे रात्री १ वाजता ट्रकमध्ये बसवून दहेगाव येथे रवाना केले. सांगण्यात येते की, दहेगाव बस थांब्यावर रात्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्रांना भेटला. दोन दिवस मित्रांसोबत राहिला. पिपळा, चनकापूर व खापरखेडा परिसरात फिरला. दारूच्या नशेत तो पडल्याने गावातील काही लोकांनी त्याला १९ मे रोजी मेडिकलला पाठविले. तेथून आल्यावर त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले. २१ मे रोजी जेव्हा त्याची प्रकृती खालावली तेव्हा सावनेर तहसीलच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी त्याचा नमुना पॉझिटिव्ह आला. याच्या कुटुंबातील सात लोकांसह एकूण १८ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.-बुटीबोरी येथील बापलेक पॉझिटिव्ह मुंबई येथून २७ वर्षीय मुलगा १६ मे रोजी बुटीबोरी येथे आपल्या घरी आला. सात दिवसानंतर त्याला ताप, सर्दी व घशात इन्फेक्शन झाले. त्याचे ५२ वर्षीय वडिलांनाही अस्थमा व उच्चरक्तदाबाचा त्रास वाढला. यामुळे आज दोघेही मिहान येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आले. दोघांची लक्षणे पाहून येथील डॉक्टरांनी संशयित म्हणून नमुने घेतले. नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला ‘एम्स’मध्ये भरती करून घेतले. प्रथमच बुटीबोरी येथे रुग्णाची नोंद झाल्याने येथील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. त्यांच्या घरातील सदस्यांसह इतरही काही लोकांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे.
‘एम्स’मध्ये पहिल्यांदाच पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार
नागपुरात कोरोनाबाधितांवर केवळ मेयो, मेडिकलमध्येच उपचार सुरू होते. परंतु आता ‘एम्स’नेही कोविड रुग्णांवर उपचार सुरू केले. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या बापलेकाला कोविड वॉर्डात भरती केले. या वॉर्डात कोविड रुग्णांसाठी १६ खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एम्सच्या संचालक, मेजर जनरल डॉ. विभा दत्ता म्हणाल्या, पायाभूत सोयींचे काम सुरू असल्याने तूर्तास तरी १६ खाटांचा वॉर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोविड विषाणू चाचणीसाठी आणखी एक यंत्र दाखल झाले असून ते स्थापन केले जात आहे.
भिकारी पॉझिटिव्ह
धोकादायक सीए रोडवर पडून असलेल्या एका भिकाºयाची प्रकृती खालावल्याने एका पोलीस कर्मचाºयाने चार दिवसापूर्वी मेयोत दाखल केले. त्याने पॅन्टमध्ये संडास केली होती. डॉ. रणजित यादव यांनी कर्मचाºयांच्या मदतीने त्याची सफाई करून औषधोपचाराला सुरुवात केली. शुक्रवारी त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविला असता तो पॉझिटिव्ह आला. एखाद्या भिकाºयाचा नमुना पॉझिटिव्ह येणे हे धोकादायक असल्याचे वरिष्ठ डॉक्टरांचे मत आहे. त्यांच्यानुसार त्या परिसरात बाधित रुग्ण असावे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
कोलकाता येथील महिला पॉझिटिव्ह
मुंबई येथून कोलकाता येथे बसने प्रवास करणाऱ्या ३८ आठवडे पूर्ण झालेल्या २२ वर्षीय गर्भवतीच्या पोटात दुखू लागल्याने तातडीने नागपुरला बस आणण्यात आली. दुपारी ३.३०वाजता मेडिकलमध्ये तिची प्रसुती झाली. तिला अडीच किलोची मुलगी झाली. प्रसूत महिलेच्या चाचणीचा अहवाला रात्री पॉझिटव्ह आला. विशेष म्हणजे ती महिला ज्या बसमध्ये प्रवास करीत होती त्यात २५ प्रवासी आहेत. याची माहिती मेडिकल प्रशासनाने मनपाला दिली.
आठ महिन्याची गर्भवती पॉझिटिव्ह
उत्तर नागपुरात कमाल चौकपर्यंतच कोरोनाचा प्रादुर्भाव होता. परंतु आता तो टेकापर्यंत पोहचला आहे. आठ महिन्याची गर्भवती असलेली ही २८ वर्षीय महिला तपासणीसाठी शुक्रवारी मेयो रुग्णालयात आली. नियमानुसार तिचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. गर्भवतीच्या घरातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
१४ रुग्ण कोरोनामुक्त
मेयो, मेडिकलमधून १४ रुग्णांना सुटी देण्यात आली. मेयोमधील गोळीबार चौक येथील एक, सतरंजीपुरा येथील एक, टिमकी येथील सहा तर हंसापुरी येथील चार असे १२ रुग्णांना सुटी देण्यात आली. मेडिकलमधील शताब्दीनगर चौक येथील २८वर्षीय तर पार्वतीनगर येथून २४ वर्षीय पुरुष असे दोघांना सुटी देण्यात आली. नागपुरात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३३६ झाली आहे.
मुंबई येथून कोलकाताला जाणाऱ्या स्त्रीची मेडिकलमध्ये प्रसुती
मुंबई येथून कोलकाता येथे बसने प्रवास करणाऱ्या ३८ आठवडे पूर्ण झालेल्या २२ वर्षीय गर्भवतीच्या पोटात दुखू लागल्याने तातडीने नागपूरला बस आणण्यात आली. मेडिकलमध्ये तिची प्रसुती झाली. तिला अडीच किलोची मुलगी झाली. तिच्या सोबत तिचा पती असून दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १८८
दैनिक तपासणी नमुने १७१
दैनिक निगेटिव्ह नमुने १६५
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ४१६
नागपुरातील मृत्यू ०७
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३३६
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २३५७
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १७८४
पीडित-४१६-दुरुस्त-३३६-मृत्यू-७