CoronaVirus in Nagpur : कोरोनाचा पुन्हा ब्लास्ट, ६६ दिवसांनी ५०० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 10:23 PM2021-02-11T22:23:30+5:302021-02-11T22:25:46+5:30
Corona Virus Blast Again कोरोनाबाबत वाढलेली बेफिकरी, कमी झालेला मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा व सॅनिटायझरचा कमी झालेल्या वापरामुळे मागील चार दिवसांत १३९८ नव्या रुग्णांची भर पडली. गुरुवारी रुग्णसंख्येत तब्बल ५०० नव्या रुग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाबत वाढलेली बेफिकरी, कमी झालेला मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा व सॅनिटायझरचा कमी झालेल्या वापरामुळे मागील चार दिवसांत १३९८ नव्या रुग्णांची भर पडली. गुरुवारी रुग्णसंख्येत तब्बल ५०० नव्या रुग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला. बाधितांची एकूण संख्या १३७४९८ झाली असून आज ५ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४२१५ वर पोहोचली.
केंद्रीय आरोग्य पथकाने नुकताच नागपूर जिल्ह्याचा आढावा घेतला. यात वाढत्या रुग्णसंख्येला घेऊन चिंता व्यक्त केली होती. त्यांनी कमी झालेल्या चाचण्या वाढविण्याच्या व बाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचे ट्रेसिंग वाढवून त्यांची चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला होता. परिणामी, मागील दोन दिवसांपासून चाचण्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. आज नागपूर जिल्ह्यात ५०८५ संशयितांच्या चाचण्या झाल्या. यात ४०२२ आरटीपीसीआर तर १०६३ रॅपीड अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीआरमधून ४५७ तर अँटिजनमधून ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या रुग्णामंध्ये शहरातील ४४५, ग्रामीणमधील ५३, तर जिल्ह्याबाहेरील २ रुग्ण आहेत. मृतांमध्ये आज शहरातील २, ग्रामीणमधील १ तर जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचे बळी गेले. २१६ रुग्ण बरे झाले असून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १२९७३६ झाली आहे. ३५४७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
५ डिसेंबर रोजी होती ५२७ रुग्णांची नोंद
नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात दैनंदिन रुग्णांची संख्या ५०० वर गेली होती. सप्टेंबर महिन्यात त्यात वाढ होऊन २००० वर पोहोचली; परंतु ऑक्टोबरपासून त्यात घट होऊ लागली होती. १७ ऑक्टोबर रोजी ५४० रुग्णसंख्येच्या नोंदीनंतर १ डिसेंबर रोजी ५१५, ३ डिसेंबर रोजी ५३६, तर ५ डिसेंबर रोजी ५२७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल ६६ दिवसांनी आज बाधितांची संख्या ५०० झाली.
मागील पाच महिन्यांतील रुग्णसंख्येचा उच्चांक
१७ ऑक्टोबर ५४०
१ डिसेंबर ५१५
३ डिसेंबर ५३६
५ डिसेंबर ५२७
११ फेब्रुवारी ५००
दैनिक चाचण्या : ५०८५
बाधित रुग्ण : १३७४९८
बरे झालेले : १२९७३६
उपचार घेत असलेले रुग्ण : ३५४७
मृत्यू : ४२१५