CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा जोर कमी : दोन महिन्यानंतर २० मृत्यूची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:51 AM2020-10-09T00:51:19+5:302020-10-09T00:52:35+5:30
Corona Virus , Nagpur News कोरोनाचा जोर कमी होऊ लागला आहे. मागील सात दिवसांत हजाराच्या आत रुग्ण, तर ३०च्या खाली रुग्णांचे मृत्यू झाले. दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच गुरुवारी २० मृत्यूची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा जोर कमी होऊ लागला आहे. मागील सात दिवसांत हजाराच्या आत रुग्ण, तर ३०च्या खाली रुग्णांचे मृत्यू झाले. दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच गुरुवारी २० मृत्यूची नोंद झाली. यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्याही कमी होऊन ७४६ वर आली आहे. रुग्णांची एकूण संख्या ८४,८२७ तर मृतांची संख्या २,७२४ झाली आहे. मात्र, पुढील महिने थंडीचे आहेत. अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या या आठ महिन्यात सर्वाधिक रुग्ण सप्टेंबर महिन्यात आढळून आले. या महिन्यात केवळ चार दिवसच रुग्णांची संख्या हजाराखाली होती. २,३४३ हा रुग्णसंख्येचा उच्चांक ठरला. विशेष म्हणजे, १५ आॅगस्ट रोजी १४ मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर मृतांची संख्या वाढतच गेली. रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू १७ सप्टेंबर रोजी झाले. ६४ मृत्यूने वैद्यकीय क्षेत्र हादरून गेले होते. परंतु नंतर मृत्यूची संख्या कमी होऊ लागली. लवकरच स्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेयो, मेडिकलमध्येही रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मेयोमध्ये २२४ तर मेडिकलमध्ये २८१ रुग्ण उपचार घेत आहेत.
६,१६५ चाचण्यांमधून ५,४१९ रुग्ण निगेटिव्ह
नागपूर जिल्ह्यात आज ३,४४८ आरटीपीसीआर तर २,७१७ रॅपिड अॅन्टिजेन अशा एकूण ६,१६५ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. याातून ५,४१९ रुग्ण निगेटिव्ह आले. अॅन्टिजेन चाचणीतून १९० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआर चाचणी झालेल्या एम्समधून ८९, मेडिकलमधून २६, मेयोमधून ८८, माफसूमधून २९, नीरीमधून ६४ तर खासगी लॅबमधून २६० रुग्ण पॉझिटिव्ह आले.
८४ हजारांमधून आता ९ हजार रुग्णच अॅक्टिव्ह
८४ हजार बाधितांच्या एकूण संख्येच्या तुलनेत सध्या ९,४८९ रुग्णच अॅक्टिव्ह म्हणजे उपचाराखाली आहेत. शहरात ५८,१८४ रुग्ण बरे झाले असून ६,४४६ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. ग्रामीणमध्ये १४,४३० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर आता ३,०४३ रुग्ण उपचार घेत आहेत. आज १,०१२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.६० टक्क्यांवर गेले आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ६,१६५
बाधित रुग्ण : ८४,८२७
बरे झालेले : ७२,६१४
उपचार घेत असलेले रुग्ण : ९,४८९
मृत्यू : २,७२४