CoronaVirus in Nagpur : कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, ३८५ नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 12:41 AM2020-11-04T00:41:38+5:302020-11-04T00:43:42+5:30
Corona virus outbreak, Nagpur news कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असताना मंगळवारी चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णसंख्येतही वाढ झाली. ३८५ रुग्णांचे निदान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असताना मंगळवारी चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णसंख्येतही वाढ झाली. ३८५ रुग्णांचे निदान झाले. विशेष म्हणजे, जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच शहरात एका मृत्यूची नोंद झाली. ग्रामीण भागात तीन तर जिल्ह्याबाहेरील पाच रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या सातवर गेली. रुग्णांची एकूण संख्या १,०३,६४२ तर मृतांची संख्या ३,४२९ झाली आहे.
नागपूर जिल्ह्यात आज ५,४६८ चाचण्या झाल्या. यात ३,१७३ आरटीपीसीआर तर २,२९५ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचा समावेश होता. मागील पाच दिवसांच्या तुलनेत आज जास्त चाचण्या झाल्या. ॲन्टिजेन चाचण्यातून ३१ रुग्ण पॉझिटिव्ह तर २,२६४ रुग्ण निगेटिव्ह आले. एम्सच्या प्रयोगशाळेत झालेल्या आरटीपीसीआर चाचणीत १६, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ३२, मेयोच्या प्रयोगशाळेतून ५८, माफसूच्या प्रयोगशाळेतून आठ, नीरीच्या प्रयोगशाळेतून २०, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून १६ तर खासगी लॅबमधून २०४ बाधित रुग्णांचे निदान झाले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २४१, ग्रामीणमधील १३९ तर जिल्ह्याबाहेरील पाच रुग्ण आहेत.
रुग्ण बरे होण्याचा दर ९३.११ टक्क्यांवर
ऑगस्ट महिन्यात रुग्ण बरे होण्याचा दर ४१ टक्के होता. मागील दोन महिन्यात यात वाढ होऊन आज तो ९३.११ टक्क्यांवर गेला आहे. बरे झालेल्यांमध्ये ४०१ रुग्णांची भर पडली. कोरोनामुक्तांची एकूण संख्या ९६,५०६ झाली आहे. यात शहरामधील ७६,९८० तर ग्रामीणमधील १९,५२९ बरे झालेले रुग्ण आहेत. सध्या ३,७०४ रुग्ण उपचाराखाली आहेत. यात १,३७४ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात दाखल आहेत. तर २,३३० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ५,४६८
बाधित रुग्ण : १,०३,६४२
बरे झालेले : ९६,५०६
उपचार घेत असलेले रुग्ण : ३,७०४
मृत्यू : ३,४२९