CoronaVirus in Nagpur : १३१ दिवसानंतर शहरात पहिल्यांदाच शुन्य मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 11:14 PM2021-06-18T23:14:09+5:302021-06-18T23:14:33+5:30
CoronaVirus, Nagpur news दुसऱ्या लाटेच्या प्रकोपानंतर नागपुरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. १३१ दिवसानंतर शहरात पहिल्यांदाच शुन्य मृत्यूची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसऱ्या लाटेच्या प्रकोपानंतर नागपुरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. १३१ दिवसानंतर शहरात पहिल्यांदाच शुन्य मृत्यूची नोंद झाली. तर, ग्रामीणमध्ये सलग सहाव्या एकही मृत्यू नोंदविण्यात आलेला नाही. नागपूर जिल्ह्यात ५५ रुग्ण आढळून आले. यात जिल्हाबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू आहे. शहरात ३४ रुग्ण तर ग्रामीणमध्ये २० रुग्ण पॉझिटिव्ह आले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,७६,७०६ झाली असून मृतांची संख्या ९०१६ वर पोहचली आहे.
कोरोनाचा दुसऱ्या लाटेला फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. एप्रिल महिन्यात रुग्ण व मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठले होते. सात ते आठ हजाराच्या दरम्यान दैनंदिन रुग्ण आढळून येत होते. १९ एप्रिल रोजी शहरात ७५ तर ग्रामीण मिळून
जिल्ह्यात ११३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली होती. २ मे रोजी ११२ मृत्यूनंतर रुग्ण व मृत्यूच्या संख्येत घट येऊ लागली. जून महिन्यात दिलासादायक चित्र निर्माण झाले. नागपूर जिल्ह्यात ३ जूनपासून दैनंदिन मृत्यूची नोंद १०च्या आत होऊ लागली. मागील सहा दिवसांत शहरातील मृत्यूची संख्या १ असताना ग्रामीणमध्ये शुन्य मृत्यूची नोंद होत आहे.
कोरोनाचा मृत्यूदर १.८९ टक्के
नागपूर जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्यूदर १.८९ टक्के, तर पॉझिटिव्हीटीचा दर ०.५९ टक्क्यांवर आला आहे. शुक्रवारी ९२७० नमुने तपासण्यात आले. यात शहरातील ६७६० नमुन्यांमध्ये ०.५० टक्के तर ग्रामीणमधील २५१० नमुन्यांमध्ये ०.७९ टक्के रुग्ण बाधित आढळून आले. आज मृत्यू झालेला रुग्ण हा यवतमाळ जिल्ह्यातील असून नागपूरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. १२८ रुग्ण बरे झाले. यात शहरातील ९४ तर ग्रामीणमधील ३४ रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९७.८८ टक्के आहे. जिल्ह्यात ११०२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून यात २६५ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल तर, ८३७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. कोरोनाचा दुसºया लाटेत शहरात पहिल्यांदाच शुन्य मृत्यूची नोंद झाल्याने महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या सेवेचा गौरव केला.
सतर्क रहा, नियमांचे पालन करा
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, नागरिकांचा संयम, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि मनपा व जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमामुळे शहरातील मृत्यूची संख्या शुन्यावर आली आहे. सर्वांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. कोरोनाचा तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी सतर्क राहण्याचे व कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शहरातील मृत्यू
दिनांक : मृत्यू
७ फेब्रुवारी : ००
१५ फेब्रुवारी :०३
१९फेब्रुवारी:०४
१ मार्च :०४
१५ मार्च : ०७
१८ मार्च : १४
२५ मार्च : ३३
१ एप्रिल : ३५
१५ एप्रिल : ३९
१८ एप्रिल : ४५
१९ एप्रिल : ७५
२० एप्रिल : ५०
२५ एप्रिल : ४६
३० एप्रिल : ३९
१ मे : ५५
५ मे : ४८
१० मे : ३१
१५ मे : २२
३१ मे: ०६
५ जून : ०३
१५ जून : ०२
१८ जून : ००