CoronaVirus in Nagpur : नागपुरात कहर सुरूच, २२०५ रुग्ण पॉझिटिव्ह, ३४ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 11:30 PM2020-09-08T23:30:05+5:302020-09-08T23:31:20+5:30
कोरोनाचा कहर अधिकच वाढत चालला आहे. मंगळवारी २२०५ नव्या रुग्णांची भर पडली. आतापर्यंतचा रुग्णसंख्येतील ही सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णसंख्या ४३,२३७ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २८५४, ग्रामीणमधील ३४९ तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्ण आहेत. आज ३४ रुग्णांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा कहर अधिकच वाढत चालला आहे. मंगळवारी २२०५ नव्या रुग्णांची भर पडली. आतापर्यंतचा रुग्णसंख्येतील ही सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णसंख्या ४३,२३७ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २८५४, ग्रामीणमधील ३४९ तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्ण आहेत. आज ३४ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूची संख्या १३९९ झाली आहे. विशेष म्हणजे, रोजच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असला तरी १८०३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच चालली आहे. आज दिवसभरात ८३०८ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ३०५८ रुग्णांची आरटीपीसीआर तर ५२५० रुग्णांची रॅपिड अॅन्टिजन चाचणी करण्यात आली. रॅपिड अॅन्टिजन चाचणीतून ११४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंतची ही सर्वाधिक नोंद आहे तर, आरटीपीसीआर चाचणीतून १०५६ रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले आहे. खासगी लॅबमधून ४८७ रुग्णांची नोंद झाली. एम्सच्या प्रयोगशाळेतून ३३, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून १६८, मेयोच्या प्रयोगशाळेतून ३७१, माफसूच्या प्रयोगशाळेतून ७४ तर खासगी लॅबमधून ३१८ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
मृत्यूच्या संख्येत किंचित घट
सोमवारी नागपूर जिल्ह्यात ५० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असताना मंगळवारी यात किंचित घट दिसून आली. ३४ रुग्णांचे मृत्यू झाले. यात २८ रुग्ण शहरातील, ४ रुग्ण ग्रामीणमधील तर दोन रुग्ण जिल्ह्याबाहेरील होते. शहरात आतापर्यंत एकूण १०७७, ग्रामीणमध्ये १९६ तर जिल्ह्याबाहेरील १२६ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ३.२३ टक्केआहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्के
नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या कमालीची वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. आज १८०३ रुग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ३०४४१ झाली आहे. बरे होण्याचे प्रमाण ७०.४५ टक्क्यांवर पोहचले आहे. शासकीयसह खासगी हॉस्पिटल व कोविड के अर सेंटरमध्ये ११३७७ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ८३०८
बाधित रुग्ण : ४३,२३७
बरे झालेले : ३०४४१
उपचार घेत असलेले रुग्ण : ११३७७
मृत्यू :१३९९