CoronaVirus in Nagpur नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक :२४ तासांत ८९ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 10:42 PM2021-04-26T22:42:44+5:302021-04-26T22:46:20+5:30
Corona Virus , Nagpur Newsउपराजधानीत कोरोनाची दाहकता कायम असून सोमवारच्या अहवालानुसार २४ तासात जिल्ह्यात ८९ मृत्यू झाले. मात्र नव्या रुग्णांपेक्षा परत एकदा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक होती. मागील आठ दिवसांतील सर्वात कमी चाचण्या सोमवारी झाल्या असून जिल्ह्यातील एकूण मृत्यूसंख्या सात हजारांवर गेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत कोरोनाची दाहकता कायम असून सोमवारच्या अहवालानुसार २४ तासात जिल्ह्यात ८९ मृत्यू झाले. मात्र नव्या रुग्णांपेक्षा परत एकदा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक होती. मागील आठ दिवसांतील सर्वात कमी चाचण्या सोमवारी झाल्या असून जिल्ह्यातील एकूण मृत्यूसंख्या सात हजारांवर गेली आहे.
सोमवारी जारी झालेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात ५ हजार ८५२ नवे बाधित आढळले. यातील ३ हजार ६६० शहरातील तर २ हजार १८५ ग्रामीण भागातील आहेत. तर ठीक झालेल्या रुग्णांचा आकडा ५ हजार ९२१ होता. मृतांमध्ये ५४ शहरातील, २५ ग्रामीणमधील व जिल्ह्याबाहेरील १० जणांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३ लाख ७९ हजार ९८० बाधित व सात हजार २५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
चाचण्यांची संख्या घटली
सोमवारी चाचण्यांची संख्यादेखील घटल्याचे दिसून आले. केवळ १८ हजार ९९७ संशयितांची चाचणी झाली. यात शहरातील १४ हजार ७७० व ग्रामीणमधील ४ हजार २७० जणांचा समावेश होता.
सक्रिय रुग्ण ७७ हजार
जिल्ह्यात ७७ हजार ३३८ सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरातील ४६ हजार ९०१ व ग्रामीणमधील ३० हजार ४३७ जणांचा समावेश आहे. सरकारी व खासगी रुग्णालयांत १४ हजार ७६८ रुग्ण दाखल आहेत, तर ६२ हजार ५७० रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत.