CoronaVirus in Nagpur : नागपूर शहरात कोरोनाचे चारच बळी : ५४० नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 09:55 PM2020-10-17T21:55:06+5:302020-10-17T21:57:20+5:30
Corona Victims decreasing, Nagpur City कोरोनाच्या आठ महिन्याच्या काळात ८३ दिवसानंतर शहरात पहिल्यांदाच चार व ग्रामीणमध्ये दोन रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या आठ महिन्याच्या काळात ८३ दिवसानंतर शहरात पहिल्यांदाच चार व ग्रामीणमध्ये दोन रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्याबाहेरील सात मृतांचा समावेश झाल्याने नागपूर जिल्ह्यात मृतांची संख्या १३ झाली. ही संख्याही ७७ दिवसानंतर दिसून आली. आज ५४० बाधित नवे रुग्ण आढळले. रुग्णांची एकूण संख्या ९०३०१ तर बळींची संख्या २९२५ झाली.
शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च रोजी बजाजनगर येथे आढळून आला. सुरूवातीचे पाच महिने कोरोनाचा प्रादुर्भावाचा वेग संथ होता. परंतु ऑगस्ट महिन्यापासून वेग वाढायला लागला. आता तो पुन्हा कमीकमी होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात २६ जुलै रोजी तीन मृतांची नोंद होती. त्यानंतर मृत्यूच्या संख्येत वाढ होतच गेली. जिल्ह्यात १ ऑगस्ट रोजी मृत्यूची संख्या १३ होती. त्यानंतर आज ही संख्या दिसून येत आहे. मृत्यूचा दर कमी होऊन २.८७ टक्क्यांवर आला आहे.
रिकव्हरी रेट १.९३ टक्क्यांने वाढला
या आठवड्याच्या सुरुवातीला, ११ ऑक्टोबर रोजी कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ८७.३७ टक्क्यांवर होता. तर रुग्ण दुप्पटीने वाढण्याचा दर ७१.९ दिवसांचा होता. आज ७९० रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्तांची संख्या ८०६४३ झाल्याने रिकव्हरी रेट ८९.३० टक्क्यांवर पोहचला आहे. १.९३ टक्क्याने हा दर वाढला आहे. रुग्ण दुपटीने वाढण्याचा दर आता १०६ दिवसांवर आला आहे. यामुळे आजचा दिवस आरोग्य यंत्रणेसाठी खऱ्या अर्थाने दिलासादायी ठरला आहे.
६८६२ चाचण्या निगेटिव्ह
नागपूर जिल्ह्यात आज ३५५३ रुग्णांची आरटीपीसीआर तर ३८४९ रुग्णांची रॅपीड अँटिजन असे एकूण ७४०२ चाचण्या झाल्या. यात ६८६२ चाचण्या निगेटिव्ह आल्या. अँटिजन चाचणीतून २२६ तर आरटीपीसीआर चाचणीतून ३१४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एम्सच्या प्रयोगशाळेतून ५१, मेडिकलच्या प्रयोगाशळेतून २५, मेयोच्या प्रयोगशाळेतून ६५, माफसूच्या प्रयोगशाळेतून १५, नीरीच्या प्रयोगशाळेतून ५३ व खासगी लॅबमधून १०४ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले.
मेयोमध्ये कोविडचे १०६ रुग्ण
मेयोमध्ये शनिवारी कोविडचे १०६ रुग्ण उपचाराखाली होते. ऑगस्ट महिन्यानंतर पहिल्यांदाच स्थिती सुधारली. यामुळे डॉक्टरांसह परिचारिका व कर्मचाऱ्यांना काहीसे समाधान मिळाले. मेडिकलमध्ये सध्याच्या स्थितीत २३८, एम्समध्ये २७ यासह इतर खासगी रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये २२२२ रुग्ण उपचार घेत आहेत. ४५११ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ७४०२
बाधित रुग्ण : ९०३०१
बरे झालेले : ८०६४३
उपचार घेत असलेले रुग्ण : ६७३३
मृत्यू :२९२५