CoronaVirus in Nagpur : नागपुरात एका दिवसात सर्वाधिक १० मृत्यू , ३०५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 01:03 AM2020-07-30T01:03:17+5:302020-07-30T01:04:56+5:30
नागपूर जिल्ह्यात कोविडने थैमान घालायला सुरुवात केली आहे. बुधवारी जिल्ह्यात सर्वाधिक ३०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून १० जणांचा मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील २२५ आणि ग्रामीणमधील ८० संसर्गित रुग्ण आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोविडने थैमान घालायला सुरुवात केली आहे. बुधवारी जिल्ह्यात सर्वाधिक ३०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून १० जणांचा मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील २२५ आणि ग्रामीणमधील ८० संसर्गित रुग्ण आहेत. जिल्ह्यासोबतच शहरातीलही ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे. कोरोना संसर्गित रुग्णांची एकूण संख्या ४,७९२ आणि मृत रुग्णांची संख्या १०९ वर पोहोचली आहे. यासोबतच बुधवारी सर्वाधिक ३७९ रुग्ण बरे होऊ घरी परतले ही आनंदाची बाबही आहे. आतापर्यंत एकूण ३०६९ रुग्ण बरे झालेले आहेत.
दोन दिवसापूर्वी २७ जुलै रोजी जिल्ह्यात २७४ पॉझिटिव्ह रुग्ण आणि १० जणांचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यात ११५ दिवसात मृतांची संख्या १०० वर पोहोचली आहे. मागील एका आठवड्यापासून नागपूर जिल्ह्यात कोविड-१९ चा संसर्ग अनियंत्रित झाला आहे. मेडिकलमध्ये ५ संसर्गीत रुग्णांचा मृत्यू झाला. यातील एका रुग्णाचा रिपोर्ट अमरावतीत पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे तिचा मृत्यू अमरावती जिल्ह्यातच गणला जाईल. उर्वरित ४ मृतांमध्ये यशोधरानगर येथील ५९ वर्षीय पुरुष, रामबाग येथील ५० वर्षीय पुरुष, २५ वर्षीय पुरुष आणि वरुड अमरावती येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये श्वास घेण्यासोबतच हायपर टेंशन आणि डायबिटीजचाही त्रास होता. मेयोमध्ये ६ रुग्णांचा मृत्यू झाला. यात पंचशीलनगर येथील ५० वर्षीय महिला, मध्यप्रदेश बैतुल येथील २० वर्षीय महिला, गांधीबाग येथील ५८ वर्षीय पुरुष, नारी रोड येथील ६८ वर्षीय पुरुष, आरएमएस कॉलनी ७५ वर्षीय महिला, भारतनगर कळमना येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आज मृत रुग्णांमधील नागपूर शहरातील ८ व २ शहराबाहेरचे आहेत.
प्रशासनाने जारी केलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेयोच्या प्रयोगशाळेत २८, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ६४, एम्सच्या प्रयोगशाळेत ६४, नीरी च्या प्रयोगशाळेत २५, माफसूच्या प्रयोगशाळेत ५६, खासगी प्रयोगशाळेत ३५, एटीजन टेस्टमध्ये १५ पॉझिटिव्ह आढळले आहेत. नागपूर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६४.४ टक्के इतके आहे.
अॅक्टिव्ह १६१४
स्वस्थ ३०६९
मृत १०९
डिलिव्हरीनंतर आईचा मृत्यू, नवजात बाळ सुखरूप
मेयो रुग्णालयात पॉझिटिव्ह महिलेने एका सुदृढ बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर तिचा मृत्यू झाला. नवजात बाळाचे वजन ३ किलो आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलताई बैतूल येथील २० वर्षीय महिलेला गंभीर अवस्थेत मेयोमध्ये दाखल करण्यात आले. डिलिव्हरीनंतर तिचा मृत्यू झाला. मेयोचे उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सांगितले की, डिलिव्हरीनंतर कोविड पॉझिटिव्ह महिलेच्या मृत्यूचे हे नागपुरातील पहिलेच प्रकरण आहे. सुरक्षित प्रसूती करून नवजात बाळाला वाचवण्यात आले. महिलेला गंभीर अवस्थेत प्रसवपीडेदरम्यान भरती करण्यात आले होते. त्यांना प्रेगनन्सी हायपरटेन्शनसह अनेक समस्या होत्या. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना दीड दिवसापासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. नवजात बाळ पूर्णपणे स्वस्थ आहे. त्यामुळे सध्यातरी त्याची तपासणी करण्यात आलेली नाही. महिलेची सर्जरी स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत उईके, अधीक्षक डॉ. रवी चव्हाण, कोविड इन्चार्ज डॉ. बिटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
रेल्वेतील वरिष्ठ अभियंता पॉझिटिव्ह
नागपूर रेल्वेस्थानकावर कार्यरत एक वरिष्ठ अभियंता पॉझिटिव्ह निघाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित अभियंता कॅरेज अॅण्ड वॅगन विभागात कार्यरत आहे. २४ जुलैपासून तो कार्यालयात आला नाही. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्याने कोरोनाची चाचणी केली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कुटुंबीयांनी आज रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली. या अभियंत्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्यांची तपासणी तसेच त्यांना होम क्वरंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी रेल्वे सुरक्षा दलाचे १६ जवान पॉझिटिव्ह आले होते.