Corona virus : हा कर्फ्यू नव्हे तर जनतेच्या काळजीसाठी सरकारने घेतलेली दक्षता : नितीन राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 08:49 PM2020-03-21T20:49:14+5:302020-03-21T20:50:20+5:30
पंतप्रधानांनी जाहीर केलेला हा कर्फ्यू नव्हे तर जनतेच्या काळजीसाठी सरकारने घेतलेली दक्षता आणि आवाहन आहे. हे देशावर आलेले संकट आहे. त्यामुळे त्याचे सर्व नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधानांनी जाहीर केलेला हा कर्फ्यू नव्हे तर जनतेच्या काळजीसाठी सरकारने घेतलेली दक्षता आणि आवाहन आहे. हे देशावर आलेले संकट आहे. त्यामुळे त्याचे सर्व नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयातील जनप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत यांनी हे आवाहन केले. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित होते.
राऊत म्हणाले, जनतेने राष्ट्राचा विचार करावा. लोकांच्या सहकार्याची आज गरज आहे. रुग्णांच्या घरावर पोलिसांची नजर असून त्यांना घरीच कोरोंटाईन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. संशयित रुग्ण मोकळे फिरत असल्याचे यावेळी पत्रकारांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. कोरोनासंदर्भात विदेशी पर्यटकांची यादी प्रशासनाने तयार केली आहे.
विदेशातून आलेल्या लोकांनी स्वत:हून आपली माहिती कळवावी आणि उपचार करून घ्यावेत. जनतेला सुद्धा अशा नागरिकासंदर्भात माहिती असेल तर त्यांनी त्यांची नावे प्रशासनाला द्यावी. भविष्यात गरज पडली तर ट्रान्सपोर्ट बंदचा देखील विचार करावा लागेल. राज्यात आणीबाणी आणि आपत्कालीन कायदा लागू आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाची काळजी सर्वांनी घ्यावी, अन्यथा प्रशासनाला सक्ती करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
जनता स्वयंस्फूर्तीने प्रसार रोखण्यासाठी पुढे येत आहे. प्रशासनाच्या कामामुळे आणि वैद्यकीय सेवेमुळे ही परिस्थिती नियंत्रणात असल्याबद्दल त्यांनी यंत्रणेचे कौतुक केले.
या पत्रकार परिषदेपूर्वी झालेल्या बैठकीत कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा मंत्र्यांनी घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मिश्रा, मेयोचे डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मजूरवर्गांसाठी नियोजन करण्याचा सरकारचा विचार
नितीन राऊत म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३१ मार्चपर्यंत प्रशासनाने बंदी घातल्याने मजूरवर्गाची अडचण झाली आहे. हे आम्ही समजू शकतो. ३१ मार्चनंतर अशीच परिस्थिती कायम राहिली तर त्यांना कशी मदत करता येईल याचे नियोजन आम्ही करू. या विषयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. मुख्यमंत्री संपूर्ण परिस्थितीवर स्वत: नियंत्रण ठेवून आहेत.
टोल नाक्यांवर होणार तपासणी
कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात येणाऱ्या टोल नाक्यावर तसेच आंतरराज्य सीमेवर येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. आठवडी बाजार बंद करण्यात येत आहे. कोरोनाच्या साथीचा दुसरा टप्पा सुरू असून याचा उद्रेक वाढू नये याची खबरदारी घेण्यात आल्याची ग्वाही राऊत यांनी यावेळी दिली.