Corona virus : घरातच रहा, अन्यथा बळाचा वापर करू : तुकाराम मुंढे यांची ताकीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 07:46 PM2020-03-21T19:46:31+5:302020-03-21T19:48:04+5:30
नागरिकांनी घरातच राहावे, बाहेर पडून नये, असे आवाहन वारंवार केले जात आहे. परंतु याकडे काही लोक अजूनही दुर्लक्ष करीत आहेत, हे दुर्लक्ष असेच सुरू राहिले तर मला नाईलाजाने लोकांना घरी बसवण्यासाठी बळाचा वापर करावा लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोना विषाणूचा सामुदायिक संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व घबरदारी घेतली जात आहे. यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केले आहे. नागरिकांनी घरातच राहावे, बाहेर पडून नये, असे आवाहन वारंवार केले जात आहे. परंतु याकडे काही लोक अजूनही दुर्लक्ष करीत आहेत, हे दुर्लक्ष असेच सुरू राहिले तर मला नाईलाजाने लोकांना घरी बसवण्यासाठी बळाचा वापर करावा लागेल, असा इशारा मनपा आयुक्ततुकाराम मुंढे यांनी दिला आहे. सोबतच नागरिकांनी कृपा करून रस्त्यावर फिरू नये, असे आवाहनही केले आहे.
राज्य सरकारने काल शुक्रवारी रात्री १२ वाजेपासून शहरात लॉकडाऊन केले आहे. आज शनिवारी मनपा आयुक्ततुकाराम मुंढे यांनी स्वत: सकाळी ९ ते १२ या वेळात शहराचा फेरफटका मारून परिस्थितीचा आढावा घेतला. तेव्हा काही लोक सर्रासपणे टू व्हीलर व थ्री व्हीलरवर फिरताना दिसून आले. सरकारने अनेकदा आवाहन करूनही नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसत असल्याने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे अशा नागरिकांविरोधात आक्रमक झालेले आहेत. शनिवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषद घेऊन याबाबत नागरिकांना आवाहन करीत ताकीदही दिली. लॉकडाऊनचा अर्थ समजून घ्या आणि घरातच राहा. अन्यथा आम्हाला शेवटच पाऊल उचलावं लागेल, असा इशारा दिला.
सरकार व प्रशासन खूप अगोदरपासून लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करीत आहे, त्याचे पालन झाले असते तर लॉकडाऊनची वेळ आली नसती. लॉकडाऊन म्हणजे जवळपास संचारबंदी लागू झालेली आहे. तरीही लोक अजून फिरताना दिसत आहेत. पुन्हा एकदा विनंती करतोय, कृपया लॉकडाऊनचा अर्थ समजून घ्या. स्वत: घरात राहणे असा याचा अर्थ होतो. हा आजार एकमेकांपासून होणार नाही, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जे घरात राहतील त्यांनाच याचा फायदा होणार आहे. तुमच्यासाठी सर्व प्रशासन रस्त्यावर उतरलं आहे. इतर सर्व कामे बाजूला ठेवून तुमच्या सुरक्षेसाठी काम करत आहोत. अशा परिस्थितीत तुम्ही रस्त्यावर येत आहात. याचा दुष्परिणाम तुमच्याच कुटुंबावर होईल, याचा प्रादुर्भाव वाढला तर पुन्हा काही करता येणार नाही. गरज आहे ती वेळेत आणि वेळेतच सुरक्षा उपाय करण्याची.
घराच्या बाहेर न पडणे हा सर्वांत चांगला उपाय आहे. मी स्वत: आणि पोलीस आयुक्त वारंवार सांगत आहोत, तरीही ऐकत नसाल तर सक्तीने तुम्हाला घरात बसवावं लागेल. आम्हाला या बळाचा वापर करायला लावू नका, ही तुमच्याकडून अपेक्षा आहे. नागपूरच्या सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे की, कृपा करून घराच्या बाहेर पडू नका, अशी विनंतीही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली.
परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊ नये म्हणूनच खबरदारी
सध्या तरी नागपुरात परिस्थिती आटोक्यात आहे. जे चार रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या संख्येत वाढ झालेली नाही. विदेशातून प्रवास करून आलेल्या प्रत्येकाला आमदार निवास येथील क्वॉरंटाईन कक्षात ठेवले जात आहे. तेथून घरी पाठवण्यात आलेल्यांनाही १४ दिवस होम क्वॉरंटाईन करायचे आहे. त्यांच्यावर आमच्या डॉक्टरांची पूर्णपणे देखरेख आहे. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आहे. ती आटोक्याबाहेर जाऊ नये, समुदायात पसरू नये, यासाठीच खबरदारी म्हणून लॉकडाऊन करण्यात आले आहे, तेव्हा नागरिकांनी सहकार्य करावे, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले.