Corona virus : नागपुरात संशयित रुग्णांचीही प्रकृती स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:35 AM2020-03-22T00:35:24+5:302020-03-22T00:36:36+5:30
मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत १४८ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यातील सर्वच रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले असून त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत १४८ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यातील सर्वच रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले असून त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या संशयितांच्या प्रकृतीवर १४ दिवस लक्ष ठेवले जाते. त्यानुसार या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. प्रत्येक रुग्ण खबरदारीचे सर्व उपाय करीत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. शनिवारी दिवसभरात २३ नमुने मेयोच्या प्रयोगशाळेला प्राप्त झाले. यातील पहिल्या टप्प्यात तपासण्यात आलेले ८ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आले तर उर्वरीत १५ नमुन्यांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपुरात शनिवारपासून ‘लॉकडाऊन’ केले. त्यानुसार बहुसंख्य नागरिक घरातच होते. आवश्यक कामासाठी बाहेर पडणारे लोक तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून निघाले होते. ‘हॅण्ड सॅनिटायझर’ वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी ‘जनता कर्फ्यू’ही आहे. यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यास काही प्रमाणात यश येण्याची शक्यता आहे. नागपुरात आतापर्यंत २४७ कोरोना संशयित रुग्ण आढळून आले असून यातील १४८ रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. यातील चार रुग्ण सोडल्यास इतर सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले. यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या सर्वांच्या प्रकृतीवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. शनिवारी पहिल्या टप्प्यात गडचिरोली येथून दोन, अकोल्यातून चार, मेडिकल व मेयोमधून प्रत्येकी एक-एक संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यात आले. दुपारपर्यंत या सर्व नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले.
यवतमाळ, गडचिरोलीतून प्रत्येकी दोन तर सेवाग्राममधून तीन नमुने
मेयोच्या प्रयोगशाळेला दुसऱ्या टप्प्यात १५ नमुने प्राप्त झाले. यात मेडिकलमधील चार, मेयोमधील तीन, सेवाग्राममधील तीन, यवतमाळ व गडचिरोलीमधील प्रत्येकी दोन तर भंडारामधील एक नमुन्यांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत यांच्या नमुन्यांचा अहवाल येण्याची शक्यता आहे.
मेयोत तीन तर मेडिकलमध्ये चार नवे संशयित रुग्ण दाखल
मेडिकलमध्ये आज चार नवे संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. यात १९ वर्षीय युवती ही लंडन येथून तर २२ वर्षीय युवक हा थायलँड येथून प्रवास करून आला आहे. उर्वरित दोनमध्ये एक ३८ वर्षीय व ३१ वर्षीय पुरुष हे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत. या शिवाय, शुक्रवारी भरती झालेला एक असे पाच रुग्णभरती आहेत. तर मेयोमध्ये तीन नवे संशयित रुग्ण उपचार घेत आहेत.
‘होम कॉरन्टाईन’ केलेल्या रुग्णांची दोन वेळा चौकशी
ज्या संशयित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत त्यांना रुग्णालयातून सुटी देऊन घरीच थांबण्याचा सल्ला दिला जातो. अशा रुग्णांच्या प्रकृतीची दिवसातून दोन वेळा चौकशी केली जाते. त्यानुसार सर्वच रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. ‘होम कॉरन्टाईन’ केलेल्या १४८ रुग्णांमधून केवळ चार रुग्ण मेयो, मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत.
डॉ. देवेंद्र पातुरकर
जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर