नागपुरात कोरोना विषाणू तपासणारे यंत्र पडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 08:31 PM2020-04-03T20:31:29+5:302020-04-03T20:33:39+5:30
विदर्भासह छत्तीसगड व मध्य प्रदेशातील कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासण्याची जबाबदारी असलेल्या नागपुरातील मेयोच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र शुक्रवारी अचानक बंद पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भासह छत्तीसगड व मध्य प्रदेशातील कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासण्याची जबाबदारी असलेल्या नागपुरातील मेयोच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र शुक्रवारी अचानक बंद पडले. दिल्ली व मरकजमधील शेकडो संशयितांचे नमुने प्रलंबित पडले आहेत.
इंदिरा गांधी शासकीय व वैद्यकीय रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत आतापर्यंत ७६७ नमुने तपासण्यात आले आहेत. विदर्भात बाधित रुग्णांची संख्या वाढताच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे मोठ्या संख्येत नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. कोरोना संशयित नमुने तपासणीसाठी मेयोच्या प्रयोगशाळेत जुने व नवे असे दोन ‘पॉलिमर चेन रिअॅक्शन’ (पीसीआर) यंत्र आहे. जुन्या यंत्राची मर्यादा केवळ १८ नमुन्यांची तर नव्या यंत्राची मर्यादा ३०वर नमुन्यांची आहे. या दोन्ही यंत्रांवर काम सुरू होते. तीन पाळीत रोज १००वर नमुने तपासले जात होते. यातच गेल्या दोन दिवसांत दिल्ली व मरकजमधून विदर्भात आलेल्या संशयित व्यक्तींच्या नमुन्यांचाही भार वाढला आहे. असे असताना, आज अचानक दुपारी नवीन यंत्र बंद पडले. संबंधित कंपनीला याची माहिती देण्यात आली. परंतु सायंकाळपर्यंत हे यंत्र सुरू झाले नव्हते. विशेष म्हणजे, गुरुवारी रात्री तपासण्यात आलेल्या यंत्रावरील ८७ नमुने निगेटिव्ह आले होते. तर आज शुक्रवारी जुन्या यंत्रावर लावण्यात आलेल्या आठ नमुन्यांमधून वाशिम जिल्ह्यातील एक पॉझिटिव्ह तर उर्वरित सात नमुने निगेटिव्ह आले.
एम्स, मेडिकलमध्ये सोमवारपासून तपासणी!
नागपूरच्या मेडिकल व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत नुकतेच ‘पीसीआर’ यंत्र उपलब्ध झाले आहे. येत्या सोमवारपासून या यंत्रावर कोरोना संशयितांचे नमुने तपासणे सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु याला दोन्ही रुग्णालयाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
यंत्र दुरुस्त करण्याचा प्रयत्न
नवे ‘पीसीआर’ यंत्र बंद पडले आहे. दुरुस्तीचा प्रयत्न सुरू आहे. जुन्या यंत्रावर नमुने तपासले जात आहेत. परंतु या यंत्राची मर्यादा १८ नमुने तपासण्याची आहे. प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढली आहे. नमुन्यांना फ्रीजमध्ये विशिष्ट तापमानावर स्टोअर केले जात आहे. लवकरच यंत्र सुरू होईल ही अपेक्षा आहे.
डॉ. अशोक केवलिया, अधिष्ठाता, मेयो