कोरोना योद्ध्यांना रेल्वेत मिळेना कन्सेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:29+5:302021-06-22T04:07:29+5:30
आनंद शर्मा नागपूर : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून रेल्वे प्रशासनाकडून नियमित रेल्वेगाड्यांऐवजी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या रेल्वेगाड्यात प्रवाशांकडून ...
आनंद शर्मा
नागपूर : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून रेल्वे प्रशासनाकडून नियमित रेल्वेगाड्यांऐवजी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या रेल्वेगाड्यात प्रवाशांकडून अधिक प्रवासभाडे आकारण्यात येत असून विविध श्रेणीत देण्यात येणाऱ्या कन्सेशनमध्येही कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांचा जीव वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोरोना योद्धा म्हणजे डॉक्टर आणि नर्सलाही रेल्वेभाड्यात सूट दिली जात नसल्याची स्थिती आहे. एवढेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पत्रकारांनाही प्रवास भाड्यात सूट देण्यात येत नाही. यामुळे त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाच्या वतीने ३०० पेक्षा अधिक श्रेणीत सामील नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत देण्यात येते. परंतु वर्तमान काळात यात दिव्यांग, नेत्रहीन, कॅन्सरचे रुग्ण, मूकबधिर, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, सीआरपीएफ, जीआरपी, मिलिट्रीच्या जवानांसह इतर संबंधित प्रवाशांनाच कन्सेशनचा लाभ देण्यात येत आहे. तर ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नर्स, डॉक्टर, पत्रकारांसह इतर संबंधित प्रवाशांना कन्सेशनचा लाभ मिळत नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे वाहतूक सुरळीत होत आहे. अशा स्थितीत या श्रेणीतील प्रवाशांना कन्सेशनचा लाभ देण्याची मागणी रेल्वे प्रवासी करीत आहेत.
............
विशेष रेल्वेगाड्यांच्या नावावर लूट
कोरोनामुळे नियमित रेल्वेगाड्यांऐवजी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. यात प्रवाशांकडून अधिक प्रवासभाडे वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी ऐकावयास येत आहेत. प्रवाशांच्या मते प्रवासभाडे वाढविले, परंतु त्या प्रमाणात सुविधा पुरविण्यात येत नाहीत. ब्रेक जर्नी म्हणजे कनेक्टिंग ट्रेनची तिकिटेही जारी करण्यात येत नाहीत.
प्रवाशांमध्ये रेल्वेने भेदभाव करू नये
रेल्वेच्या प्रवास भाड्यात सवलत देण्यात प्रवाशांमध्ये भेदभाव करण्यात येत आहे. विशेष रेल्वेगाड्यांच्या नावावर अधिक शुल्क वसूल करण्यात येत आहे. परंतु प्रवाशांना सुविधा पुरविण्यात येत नाहीत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे नियमित रेल्वेगाड्या चालवून प्रवाशांकडून कमी प्रवासभाडे घेऊन त्यांना सवलत देण्याबाबत त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे.
-बसंत शुक्ला, सचिव, भारतीय यात्री केंद्र
हा धोरणात्मक निर्णय आहे
रेल्वे प्रवाशांना प्रवास भाड्यात सवलत देण्याचा निर्णय रेल्वे बोर्ड घेते. हा धोरणात्मक निर्णय आहे. नियमित रेल्वेगाड्या सुरु झाल्यानंतर सर्व श्रेणीतील प्रवाशांना सवलत मिळेल. विशेष रेल्वे गाड्यात अधिक प्रवास भाडे घेण्यात येत असल्याची बाब खरी नाही.
- एस.जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
.........