गडचिरोलीतील प्रसिद्ध कुमकोट मंडईवर कोरोनामुळे पडणार विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 07:20 AM2022-01-11T07:20:00+5:302022-01-11T07:20:02+5:30
Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध कुमकोट येथील राजेश्वरी राजमातादेवी यांच्या पूजनासाठी आयोजित मंडईवर कोरोनामुळे विरजण पडले आहे.
गडचिरोलीः कोरची तालुक्यातील एकमेव प्रख्यात श्रद्धास्थान असलेली कुमकोट येथील 60 गावची राजेश्वरी राजमाता देवी यांच्या पूजेला दरवर्षी श्रद्धालू लोकांची हजारोच्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी गर्दी होतो मात्र यावर्षी कोरोनाची तिसऱ्या लाटेमुळे दिनांक 10 जानेवारीला जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या शासन निर्देशानुसार लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन निर्बंध लावण्यात आले आहे त्यामुळे नियमांचे पालन करूनच यावेळी मंदिरात पूजा होणार आहे.
सदर मंडई दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बुधवारी भरतो मात्र यावर्षी ही मंडई 12 जानेवारी 2022 ला येत्या दोन दिवसानंतर भरणार होती. महत्वाचे म्हणजे या ठिकाणची देवमंडई झाल्यानंतरच तालुक्यातील इतर गावांची मंडई भरत असतो. तसेच या मंडई निमित्याने तरुण युवक युवतीमध्ये जास्त उत्साह बघायला मिळतो जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील तरुण-तरुणीला मंडईच्या निमित्याने एकमेकांची भेट होवून लग्न करण्यास मदत होते.
दरवर्षी याठिकाणी मोठी जत्रा भरतो यामध्ये सर्वाधिक छोटे दुकानदार दुकाने लावत असतात ज्यामध्ये मिठाई,भाजीपाला,चहा नास्ता हॉटेल,पूजा सामग्री,खेळणी,झुले,आकाश पाळणा,पाणीपुरी चाट ठेला,पोस्टर दुकांनाणी सजून भरगच्च मंडई भरत असतो यामध्ये छत्तीसगढ,मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील जिल्ह्यामधील हजारो श्रद्धालू मंडई जत्रा देवीपुजा निमित्य एकत्र येत असून अनेक वर्षांनीं भेट घेत असतात. यामुळे येथील लहान दुकानदारांना दोन पैसे कमावण्याची संधी मिळत असे मात्र यावर्षी या दुकानदारांना कोरोणाच्या निर्बंधामुळे पोटावर लात बसणार आहे. दरवर्षी श्रद्धालूलोक व लहान-मोठे व्यापारी दुकानदार सर्वातआधी या मंडईची आतुरतेने वाट बघत असतात. तसेच दरवर्षीप्रमाणे यावेळी रात्रोच्यावेळी जोरदार छत्तीसगढी लोककला नृत्याचे नियोजन करण्यात आले होते मात्र ते रद्द करण्यात आले असल्याने रात्रोच्या वेळी नृत्याचं आनंद घेणारे रसिकांना निराशा व्यक्त करित आहेत.
या वर्षी गर्दी न करता जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाचे पालन करत फक्त साध्या व सोप्या पद्धतीने कुमकोट राजमाता देवीची पूजा होणार असून मंडई भरणार नसल्याने छोटे व्यापारी दुकानदारांना दुकाने लावण्यास मनाई करण्यात आले असल्याची माहिती येथील आयोजकांनी दिली आहे.