नागपुरातील विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही होणार कोरोनाची टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2022 09:02 PM2022-06-07T21:02:02+5:302022-06-07T21:02:26+5:30

Nagpur News विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स व भाजी बाजारातही कोरोनाची टेस्ट करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.

Corona will also be tested at Nagpur Airport, Railway Station, Market, Malls, Vegetable Market | नागपुरातील विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही होणार कोरोनाची टेस्ट

नागपुरातील विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही होणार कोरोनाची टेस्ट

Next
ठळक मुद्देकोरोनाचे रुग्ण वाढल्याने प्रशासन अलर्ट

नागपूर : मंगळवारी शहरात कोरोनाचे १५ रुग्ण आढळले. त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जास्तीत जास्त कोरोना तपासणीवर भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स व भाजी बाजारातही कोरोनाची टेस्ट करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.

दिल्ली आणि मुंबई येथून विमानाने येणाऱ्या प्रवाशांनी, तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनी चाचणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाद्वारे बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजार, अशा सर्व गर्दीच्या ठिकाणी सुपर स्प्रेडर्स ठरणाऱ्या व्यक्तींच्या चाचणीवरही भर देण्यात येणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेण्याचे व गर्दीच्या ठिकाणी किंवा समारंभात मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतर ठेवण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मंगळवारी मनपा मुख्यालयातील कोरोना वॉर रूमध्ये आरोग्य विभागाची एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. बैठकीत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. भावना सोनकुसळे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अतिक खान, डॉ. विजय तिवारी, डॉ. शुभम मनगटे, डॉ. सागर नायडू यांच्यासह इतर झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

- बैठकीत आयुक्तांनी दिल्या सूचना

१) कोरोना संशयित, तसेच लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींची चाचणी करावी.

२) रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी.

३) कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रवासाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांची सर्व ट्रॅव्हल हिस्ट्री काढण्यात यावी. त्यांच्या संपर्कातील सर्व निकटवर्तीयांची चाचणी करावी.

४) संभाव्य धोक्याचा सामना करण्याच्या दृष्टीने मनपाची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज करून हॉस्पिटल्स, वैद्यकीय कर्मचारी, ऑक्सिजन प्लांट, औषधे आदी सर्व सुसज्ज ठेवावी.

- लसीकरणावर भर

१२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या बूस्टर डोससाठी प्रयत्न करावेत. ज्या नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शाळा, महाविद्यालयांत शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांना नर्सेस, डॉक्टरकडून नि:शुल्क लसीकरण करावे. शहरात ३६ केंद्रांवर कोरोना चाचणी केली जात आहे.

- पहिला डोस ९९ टक्के, तर दुसरा डोस ७९ टक्के

नागपुरात ९९ टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस आणि ७९ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ वर्षांवरील वयोगटात १०४ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, ८४ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे, तसेच १५ ते १७ वर्षे वयोगटातील ६६ टक्के व्यक्तींनी पहिला डोस घेतला असून, ५० टक्क्यांनी दुसरा डोस घेतला आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटामध्ये ३९ टक्के मुलांनी पहिला आणि १७ टक्के मुलांनी दुसरा डोस घेतला आहे, तसेच १८ ते ५९ वयोगातील ६०२८ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे.

 

Web Title: Corona will also be tested at Nagpur Airport, Railway Station, Market, Malls, Vegetable Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.