नागपूर शहरात कोरोनाचा कहर, जिल्हा अद्यापही सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 12:00 AM2020-05-20T00:00:59+5:302020-05-20T00:08:53+5:30
नागपूर शहरात कोरोना पॉझिटिव्हची संख्या चारशेच्या घरात पोहचत आहे. पण ग्रामीण भाग अजूनही कोरोनापासून सुरक्षितच आहे. कामठी आणि कन्हान भागात एक रुग्ण आढळला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यात अचूक नियोजन केले आणि गावकऱ्यांनी पाळलेल्या कडक लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात कोरोना पसरू शकला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात कोरोना पॉझिटिव्हची संख्या चारशेच्या घरात पोहचत आहे. पण ग्रामीण भाग अजूनही कोरोनापासून सुरक्षितच आहे. कामठी आणि कन्हान भागात एक रुग्ण आढळला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यात अचूक नियोजन केले आणि गावकऱ्यांनी पाळलेल्या कडक लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात कोरोना पसरू शकला नाही.
कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह नागपूर शहरात मार्चच्या पहिल्या आठवड्यात सापडला. गेल्या अडीच महिन्यात एक एक करता शहरात कोरोना रुग्णांची संख्या ४०० च्या घरात पोहचली. त्यामुळे अनेक वस्त्या सील करण्यात आल्या. हजारोंच्या संख्येने लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. शहर पोलीस, महापालिका प्रशासनाने कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी जनतेला वारंवार आवाहन केले. मात्र शहरातील परिस्थिती काही सुधारली नाही. पण ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने जनतेनेच लॉकडाऊन पाळला. एक जरी व्यक्ती बाहेरचा गावात आला, तर वाऱ्यासारखी माहिती प्रशासनापर्यंत पोहचते. गावकऱ्यांनी गावाचे रस्ते बंद केले. गावातील बाजार भरले नाही. बाहेरचा कुणी गावात येणार नाही आणि गावचा कुणी बाहेर जाणार नाही, याची काळजी ग्रामस्थांनी घेतली.
एवढेच नाही, तर कोरोनाचे शहरात पदार्पण झाल्याच्या काळातच जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्यासाठी २० लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवून घेतले. खंडविकास अधिकारी, तालुका अधिकारी, आरोग्य कर्मचारी ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या बैठका घेऊन गाव सॅनिटाईझ करण्यात आले. प्रत्येक गावामध्ये आठवड्यातून तीन वेळा निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.
१४ चेकपोस्टवरून तपासणी
बाहेरच्या जिल्ह्यातून अथवा राज्यातून आलेल्या व्यक्तीची ग्रामीण सीमेवर तपासणी करण्यासाठी १४ चेकपोस्ट तयार करण्यात आले. चेकपोस्टवर वैद्यकीय अधिकारी तैनात करण्यात आले. पंचायत समिती स्तरावर कोरोना संबंधित समुपदेशन केंद्र तयार करण्यात आले.
१३२ डॉक्टरांची नियुक्ती व १४ कोविड सेंटरची निर्मिती
जिल्हा आरोग्य यंत्रणेने जिल्हाभरातील उपकेंद्रावर १३२ डॉक्टरांची नियुक्ती तसेच १४ कोविड सेंटरची निर्मिती केली. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, शिक्षक यांच्या समन्वयातून आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या काळजीमुळे ग्रामीण भाग अद्यापही कोरोनापासून दूर राहिला.
मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष व आरोग्य समिती सभापती, जि.प.