व्हेंटिलेटरवर गेलेल्या ५५ टक्क्यांवर कोरोनाबाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:07 AM2021-05-29T04:07:13+5:302021-05-29T04:07:13+5:30
नागपूर : कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसावर झालेल्या सहामधून एका रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. अशा रुग्णांना व्हेंटिलेटरवर ...
नागपूर : कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसावर झालेल्या सहामधून एका रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. अशा रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. नागपुरातील मेयो, मेडिकलसह खासगी कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेल्या अशा सुमारे ५५ टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एकट्या मेयोमध्ये १ मार्च २०२० ते २७ एप्रिल २०२१ पर्यंत ३ हजार ५०२ रुग्णांना विविध व्हेंटिलेटर्सवर ठेवण्यात आले. त्यापैकी १ हजार ४२१ रुग्ण बरे झाले, तर २ हजार ८१ रुग्णांचा मृत्यू झाले आहे.
कोरोनाचा दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या अधिक होती. यामुळे दरम्यानच्या काळात व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढली होती. शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या किंवा श्वास घेण्यास कठीण झालेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर लावले जात होते. सध्या शासकीयसह खासगी रुग्णालयात २०९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तज्ज्ञाच्या मते, व्हेंटिलेटरचे ‘मॅकेनिकल व्हेंटिलेटर’ व ‘नॉन इन्व्हॅसिव्ह व्हेंटिलेटर’ असे दोन प्रकार असतात. ‘मॅकेनिकल व्हेंटिलेटर’ एका ट्यूबद्वारे श्वासनलिकेशी जोडला जातो. हा व्हेंटिलेटर माणसाच्या फुप्फुसापर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्याचे काम करतो. तर, ‘नॉन इन्व्हॅसिव्ह व्हेंटिलेटर’ रुग्णाचे केवळ तोंड आणि नाक झाकून फुप्फुसापर्यंत ऑक्सिजन पोहोचवतो. ‘नॉन इन्व्हॅसिव्ह व्हेंटिलेटर’च्या तुलनेत ‘मॅकेनिकल व्हेंटिलेटर’वर असलेल्या रुग्णांचे मृत्यू अधिक झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात मार्च २०२० ते २६ मे २०२१ या कालावधीत ८८५४ रुग्णांचे मृत्यू झाले. यातील सुमारे ५५ टक्क्यांवर रुग्ण हे ‘व्हेंटिलेटर’ होते.
-२४ तासांत एकदाच ड्युमीडिफायरमध्ये भरले जाते पाणी
व्हेंटिलेटरमधील ड्युमीडिफायरमधील पाण्याची पातळी कमी झाल्यावर किंवा २४ तासांतून एकदा पाणी भरले जात असल्याची माहिती खासगीसह शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या काही नातेवाइकांनी दिली. तज्ज्ञाच्या मते, २४ तासांत एकदा ‘ड्युमीडिफायर’मध्ये पाणी भरण्याचा असा काही नियम नाही. तीन दिवसांनंतरही भरता येते. पण, पाणी स्वच्छ असले पाहिजे. पाण्याची पातळी कमी झाल्यावरही पाणी भरले जाते.
-‘ईटी ट्यूब’ ब्लॉक झाल्यावर तातडीने बदलली जाते
कोरोना रुग्णाचा व्हेंटिलेटरची ‘ईटी ट्यूब’ दर सहा तासांनी स्वच्छ करण्याची गरज पडत नाही. परंतु ज्या रुग्णांची ‘ईटी ट्यूब’ ब्लॉक झाली असल्यास ती तातडीने बदलली जाते. व्हेंटिलेटर व रुग्णांशी जोडलेली ‘एचएमई’ फिल्टर’ मात्र रोज बदलले जाते. जर तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तर व्हेंटिलेटरचे ‘सर्किट’ बदलले जाते, अशी माहिती तज्ज्ञानी दिली.
-दुसऱ्या लाटेतील २६ मेपर्यंत रुग्णसंख्या : ३,४९, ४०५
-उपचारानंतर बरे झालेले रुग्ण : ४,५५,२४६
-सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : २,७७२
-व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण : २०९
-मेयोमध्ये व्हेंटिलेटर लावल्यानंतर झालेले मृत्यू : २०८१