कोरोनाचा फ्रंटलाईन वॉरियर्सवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:10 AM2021-04-23T04:10:19+5:302021-04-23T04:10:19+5:30
नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी छातीची ढाल करून उभे झालेल्या फ्रंटलाईन वॉरियर्सवर अर्थात ...
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी छातीची ढाल करून उभे झालेल्या फ्रंटलाईन वॉरियर्सवर अर्थात पोलिसांवरही कोरोनाने जोरदार हल्ला चढवला आहे. शहर पोलीस दलातील एका उपायुक्तांसह ६९३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच दैनंदिन गुन्ह्यांचा तपास, समाजकंटकांवर कारवाईचे आव्हान पेलून पोलिसांना कोरोनाविरुद्धचेही युद्ध लढावे लागत आहेत. नागरिकांचा कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून पोलिसांवर वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागत आहेत. बेशिस्त नागरिकांना आणि सुपर स्प्रेडर्सना रोखण्याची तसेच त्यांना लगाम घालण्याची जबाबदारीही पोलिसांवर आहे. ती पार पाडताना नकळत पोलीस कोरोना बाधितांच्या संपर्कात येत आहेत. ही मंडळी दिवसरात्र कर्तव्य बजावून तसेच घरी परतत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोना दंश करीत आहे. शहरात गेल्या तीन महिन्यात २८८ पोलीस आणि त्यांचे ३८५ नातेवाईक कोरोनाबाधित झाले. त्यात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह तीन डझन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सर्वत्र हाहाकार निर्माण झाला असताना रेमडेसिविरची काळाबाजारी करणाऱ्या दोन टोळ्यांना सलग दोन दिवसांत जेरबंद करणारे परिमंडळ पाचचे उपायुक्त नीलोत्पल हेदेखील बाधित झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. अशाही स्थितीत न डगमगता पोलिसांचे काम जोरात सुरू आहे.
---
व्हिडिओ कॉल्सवरून मार्गदर्शन
शहरात पोलिसांचे सुसज्ज कोविड हॉस्पिटल आहे. त्यात एकूण १९ बेडची सोय असून, त्यात २ व्हेंटिलेटर तर ९ आयसीयू बेडचा समावेश आहे. हे सर्वच्या सर्व बेड भरून आहे. तीन डॉक्टर आणि १९ कर्मचाऱ्यांसह डॉ. संदीप शिंदे येथे रात्रंदिवस सेवा देत आहेत. अनेक अधिकारी, कर्मचारी खासगीत उपचार घेत आहेत. अनेकांवर घरीच (होम क्वारंटाइन) उपचार सुरू आहेत. गृह विलगीकरणात असलेल्या पोलिसांवर आवश्यक औषधोपचार करण्यासाठी ६ चमू कार्यरत आहेत. व्हिडिओ कॉल्सवरूनही त्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
---
आम्ही लढतो, तुम्ही घरात बसा - पोलीस आयुक्त ()
पोलिसांना कोरोना बाधा होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले असल्याच्या संबंधाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी चर्चा केली असता, ‘लसीकरणामुळे पोलिसांचे मनोबल चांगले वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही कोरोनाच्या संकटाशी लढत आहोत. फक्त नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. त्यांनी स्वत:च्या घरात बसूनच या लढ्यात आपले योगदान द्यावे’, असे अमितेशकुमार म्हणाले.