धार्मिक स्थळांवरही काेराेनाचे संकट; धर्मगुरूंनी स्वीकारला गृह जीवनाकडे परतण्याचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 08:16 AM2021-05-08T08:16:11+5:302021-05-08T08:50:35+5:30
Nagpur News काेराेना महामारीचे सावट धम्म प्रचाराच्या कार्यावरही पसरले आहे. लाॅकडाऊनमुळे शहरात अनेक भिक्खू संघाशी जुळलेल्या भिक्खूंचे धम्म प्रसारासाठी बाहेर जाणे बंद झाले आहे.
योगेंद्र शंभरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजात नव्या पिढीला धर्म, संस्कार व कर्तव्याची जाणीव करून देण्यात धर्मगुरूंची भूमिका महत्त्वाची असते. याप्रमाणेच बाैद्ध भिक्खू घर, कुटुंबाचा त्याग करून समाजसेवा आणि धम्म प्रचाराच्या कार्यासाठी विहारात वास्तव्य करतात. मात्र काेराेना महामारीचे सावट धम्म प्रचाराच्या कार्यावरही पसरले आहे. लाॅकडाऊनमुळे शहरात अनेक भिक्खू संघाशी जुळलेल्या भिक्खूंचे धम्म प्रसारासाठी बाहेर जाणे बंद झाले आहे. दुसरीकडे उपासक-उपासिकांचेही विहारात येणेही बंद झाले आहे. अशा परिस्थितीत या भिक्खूंची विचारपूस करणारा कुणी नाही. त्यामुळे भिक्खूंसमाेर जीवन कंठण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे अनेक भिक्खू त्यांच्या घराकडे परतले आहेत तर काही परतण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे.
प्रसंग १ : आराेग्य समस्यांनी वाढविली चिंता
उत्तर नागपुरातील एका माेठ्या बुद्धविहारातील ७२ वर्षीय भन्तेजी काेराेना काळात आपल्या घराकडे परतले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती बिघडली हाेती. या काळात त्यांची देखभाल करणारे कुणी नव्हते. याच चिंतेमुळे ते घरी परतल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रसंग दुसरा : मुलीच्या घरी गेले
याचप्रमाणे नारा रिंग राेडवरील एका विहारातील ७० वर्षीय भदन्त संघपाल यांचेही जीवनयापन करणे कठीण झाले हाेते. त्यामुळे त्यांनाही मुलीच्या घरी परत जावे लागले.
प्रसंग तिसरा : तरुण भिक्खूही परतले
स्थानिकांच्या माहितीनुसार काैशल्यानगर येथील विकारात राहून काही तरुण भदन्त धम्मप्रसार करीत हाेते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना घराकडे परतावे लागले.
काेराेनाने घेतला अनेक भिक्खूंचा बळी
शहरात जवळपास ८०० बुद्धविहार आहेत. यामध्ये बहुतेक वृद्ध भन्ते सेवा करीत आहेत. मात्र त्यांच्या उपचाराचा, औषधांचा खर्च करण्याची जबाबदारी घेणाऱ्या उपासकांची संख्या नगण्य आहे. नुकतेच गिट्टीखदान व सम्यकनगर येथील विहारात राहणाऱ्या काही भिक्खूंचे काेराेनामुळे निधन झाले.
समाजाला पुढे यावे लागेल
ज्येष्ठ भदन्त नागवंश म्हणाले, समाज प्रबाेधन व धर्म प्रचारासाठी प्रत्येक समाजाचे धर्मगुरू, पुराेहित आपला गृहत्याग करून समाजसेवेसाठी कार्य करतात. बाैद्ध भिक्खूंचेही तसेच आहे. या भिक्खूंचे जीवन उपासकांच्या दानावरच अवलंबून असते. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी समाजाने पुढे येणे आवश्यक आहे. परिसरातील नागरिकांनी थाेडी का हाेईना पण यथाशक्ती मदत करण्याची गरज आहे.