कोरोनाच्या विळख्यात ढाबे जोमात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 10:52 PM2020-07-10T22:52:29+5:302020-07-10T22:55:27+5:30
एकिकडे कोरोना विषाणूचा संसर्ग जोमात आहे आणि त्यामुळे नागपुरात रेकॉर्डतोड रुग्ण निघत आहेत आणि दुसरीकडे संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी झपाटलेल्या स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नाला शहर आणि शहराबाहेरील ढाबे संचालक गालबोट लावत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकिकडे कोरोना विषाणूचा संसर्ग जोमात आहे आणि त्यामुळे नागपुरात रेकॉर्डतोड रुग्ण निघत आहेत आणि दुसरीकडे संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी झपाटलेल्या स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नाला शहर आणि शहराबाहेरील ढाबे संचालक गालबोट लावत आहेत. स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर लढा देत असल्याचे बघून, ढाबे मालकांचे चांगलेच फावले आहे आणि त्यामुळेच चिअर्स पार्ट्या जोमात चालत आहेत.
दोन महिन्यापूर्वी एक-दोनच्या संख्येत निघणाऱ्या संक्रमित रुग्णांचा आकडा म्हणता म्हणता शंभराच्या वर गेला आणि गेल्या महिनाभरात रुग्णांच्या आकडेवारीने दोन हजाराचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारी तर एकाच दिवसात १८३ रुग्णांची भर पडली. असे असतानाही नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सिंग जपले जात नसल्याचे दिसून येते. शहराच्या आत आणि शहराबाहेर चालणाऱ्या ढाबे व सावजी भोजनालयांमध्ये जंगी पार्ट्यांची रेलचेल असल्याचे दिसून येत आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्यानेच ढाबे मालक व भोजनालय मालकांचे फावते आहे. काहीच दिवसापूर्वी ‘लोकमत’ने याबाबत स्टिंग ऑपरेशन करत ढाब्यांची पोलखोल केली होती. त्यामुळे, पोलिसांनी महामार्गांवरील ढाब्यांकडे विशेषत्वाने लक्ष पुरविण्यास सुरुवातही केली. मात्र, पोलिसांची नजर फिरताच पुन्हा ढाब्यांवरील झगमगाट उजळत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या ढाब्यांवर येणाऱ्या ग्राहकांना सॅनिटायझरही पुरविले जात नाही आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा तर पार फज्जाच उडत असल्याचे निदर्शनास येते. तब्बल दोन-अडीच महिने टाळेबंदीनंतर शासनाने नागरिकांना काही निर्देश जारी करत टाळेबंदी शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्यात रेस्तराँ, ढाबे, भोजनालयांना केवळ पार्सल देण्याची परवानगी देऊन व्यवहार सुरू करण्यास सांगितले होते. मात्र, बोट दिले तर हात पकडण्याची मानसिकता असलेल्या या संचालकांनी थेट नेहमीप्रमाणेच ग्राहकांच्या बसण्याची, जेवण्याची व पिण्याचीही व्यवस्था केलेली आहे. अशा स्थितीत कोण, कुठून येतो हे कळत नसल्याने संसर्गाचा धोका बळावला आहे.
शहरांतर्गत भोजनालयांमध्येही चालताहेत पार्ट्या
महामार्गासोबतच शहरांतर्गत भोजनालयांमध्येही रात्रीबेरात्री पार्ट्या उडत आहेत. बाहेरून दरवाजे व लाईट बंद करून आतमध्ये ग्राहकांची व्यवस्था केली जात आहे. मात्र, याकडे ना शासनाचे ना प्रशासनाचे लक्ष आहे.