‘व्हॅलेन्टाईन डे’च्या आनंदावर ‘कोरोना’चे विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 10:11 PM2021-02-12T22:11:24+5:302021-02-12T22:12:33+5:30

ValentineDay प्रेमीयुगुलांसाठी तसा रोजचा दिवस प्रेमी दिवसच असतो पण व्हॅलेन्टाईन डे सर्वात खास असतो. पण कोरोनाने सारा खेळच बिघडवला. एकतर महाविद्यालये बंद आहेत आणि रविवारची सुटी आल्यानेही प्रेमवीरांचा पुरता हिरमोड झाला आहे.

Corona's effect on joy of Valentine's Day | ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या आनंदावर ‘कोरोना’चे विरजण

‘व्हॅलेन्टाईन डे’च्या आनंदावर ‘कोरोना’चे विरजण

Next
ठळक मुद्देसुटी व महाविद्यालये बंद असल्याने प्रेमीयुगुलांचा हिरमोड : पण ‘व्हर्च्युअल लव्हगिरी’ जोरात

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : प्रेमीयुगुलांसाठी तसा रोजचा दिवस प्रेमी दिवसच असतो पण व्हॅलेन्टाईन डे सर्वात खास असतो. पाश्चात्त्य संस्कृतीच्या नावाने कितीही विरोध झाला तरी प्रत्येकाच्या पद्धतीने तो साजरा केलाच जातो. म्हणूनच प्रेमात पडलेले आणि पडण्यास इच्छुक असणारे या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. तसा तो याही वर्षी आला आहे पण ‘हाय रे कोरोना...’ विरोधकांचा विरोधही प्रेमवीरांना रोखू शकला नाही पण कोरोनाने सारा खेळच बिघडवला. एकतर महाविद्यालये बंद आहेत आणि रविवारची सुटी आल्यानेही प्रेमवीरांचा पुरता हिरमोड झाला आहे.

फेब्रुवारी महिना आला की दरवर्षी वातावरणात प्रेमाचा उत्साह भरलेला असतो. दुकाने, रेस्टॉरेंट, मॉल यावेळी लाल रंगाच्या हार्टने सजलेले असतात. भेटवस्तूंची दुकाने प्रेम साहित्याने भरलेली असतात आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटवस्तू देण्याची ओढ लागलेली असते. महाविद्यालयात तर हा उत्साह ओसंडून वाहत असतो. आपल्या आवडत्या व्यक्तीला मनातील भावना सांगण्यासाठी हुरहूर चाललेली असते. मित्र, मैत्रिणींचे घोळके जमा होऊन प्रेम दिनाच्या तयारीची चर्चा रंगत असते. मात्र यावेळी सारे काही शांत झाले आहे. व्हॅलेन्टाईन जगात फेमस असेल पण साऱ्या जगाला थांबविणाऱ्या कोरोनासमोर व्हॅलेन्टाईन सणाची काय बिशाद? असे म्हणायची वेळ आली आहे. मार्च महिन्यापासून सारे काही स्तब्ध आहे. शाळा, महाविद्यालये बंदच होती. प्रेमीवीर भेटण्याची हमखास ठिकाणे असलेली उद्यानेही ओसाड पडलेली आहेत. मात्र या सर्वांसाठी ऑनलाईन म्हणजे व्हर्च्युअली प्रेम दिन साजरा करण्याचा पर्याय उपलब्ध आहे व त्याकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे.

उद्याने ओसाड, महाविद्यालये, दुकाने शांत

व्हॅलेंटाईनचा दरवर्षी राहणारा उत्साह यावेळी दिसत नाही. महाविद्यालये नुकतीच सुरू करण्यात आली पण ताे माहाेल नाही. सर्वत्र शांतता पसरली आहे. दरवर्षी लाल कपडे, लाल रंगाच्या हार्टने सजणाऱ्या दुकानांमध्येही निरुत्साह आहे. भेटवस्तूंची दुकाने रिकामी पडली आहेत. व्हॅलेंटाईन वीकमध्ये ओसंडून वाहणाऱ्या उद्यानातील गर्दी गायब असून ती ओसाड पडलेली दिसून येत आहेत.

नवे तार जुळलेच नाहीत

सारे काही बंद असल्याने या काळात एकमेकांच्या भेटी झाल्याच नाहीत. महाविद्यालये सुरू असली की एकमेकांच्या भेटी हाेत असतात आणि प्रेमही फुलत असते. मग व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी तिला प्रपाेज करण्याची त्याची घालमेल सुरू हाेते. मात्र मार्चपासून ती बंदच असल्याने भेटीगाठीही बंद झाल्या आहेत. ऑनलाईन संवाद हाेत असला तरी ताे कामापुरताच आहे. त्यामुळे नवे तार जुळण्याची शक्यताच यावेळी नसल्याचे तरुणाईचे म्हणणे आहे.

व्हर्च्युअल पर्याय, बहुत खास

प्रत्यक्ष भेट हाेणे शक्य नसले तरी सर्व कामाप्रमाणे प्रेमातही ऑनलाईनचा पर्याय उपलब्ध आहे आणि प्रेमवीर त्याचा हमखास वापर करीत आहेत. भेटवस्तू ऑनलाईन पाठवणे, व्हिडिओ काॅलवरून संवाद साधणे व आपल्या मनातील भावना व्यक्त करणे अशा नव्या पद्धतीने व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्याची तयारी तरुणाईने केली आहे. काेराेना काळात प्रत्यक्ष भेटून धाेका पत्करण्यापेक्षा हा पर्याय सर्वाेत्तम असल्याचे तरुणांचे म्हणणे आहे.

कुटुंबासाेबतच साजरा करा

ऑनलाईन सण साजरा करण्याचा पर्याय आहे. पण त्याहीपेक्षा यावर्षी आपल्या कुटुंबासमवेत प्रेमाचा दिवस साजरा करण्याचा सर्वाेत्तम पर्याय आहे. पुन्हा पूर्ववत सर्व सुरू झाले की ताे उत्साह पुन्हा येईल पण यावेळी ती असुरक्षा स्वीकारणे याेग्य नाही. त्यामुळे कुटुंबासाेबत एन्जाॅय केला तर तेही वेगळे सरप्राईज ठरेल, अशीही भावना तरुणांची आहे.

Web Title: Corona's effect on joy of Valentine's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.