कोरोनाच्या भीतीने उष्माघात पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:07 AM2021-05-19T04:07:58+5:302021-05-19T04:07:58+5:30
नागपूर : मागील वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना संक्रमणाला उष्माघात घाबरला की काय, असे वाटत आहे. २०२० आणि चालू असलेल्या ...
नागपूर : मागील वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना संक्रमणाला उष्माघात घाबरला की काय, असे वाटत आहे. २०२० आणि चालू असलेल्या २०२१ या दोन वर्षांत जिल्ह्यात उष्माघाताची एकही नोंद नाही. या उलट २०१९ मध्ये मात्र उष्माघाताचे ८६ रुग्ण जिल्ह्यात नोंदविण्यात आले होते.
नागपुरातील उन्हाळा दरवर्षीच कडक असतो. येथील तापमानाचा पारा दरवर्षी ४५ अंशाच्या वर असतो; परंतु २०२० मध्ये मार्च महिन्यात आलेल्या कोरोना संक्रमणामुळे कडक लॉकडाऊन झाले. ते जून महिन्यापर्यंत चालले. संक्रमणाच्या भीतीने नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. मागील वर्षी उन्हही चांगले पडले. ४५ ते ४६ अंशाच्या वर पारा होता. मात्र, नागिरकांनी स्वत:ला घरातच कोंडून घेतल्याने उष्माघाताची घटना जिल्ह्यात घडली नाही. यावर्षीही १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाले आहे.
उष्माघाताच्या रुग्णांवरील उपचारासाठी दरवर्षी रुग्णालयात विशेष आयसोलेशन वॉर्ड उभारला जातो. कक्षही स्थापन केला जातो. यंदा त्याची गरजच न पडल्याने या वॉर्डाचे रूपांतर आता कोरोना आयसोलेशन वॉर्डात करण्यात आले आहे.
...
उष्माघाताची स्थिती
२०१९ - ८६ रुग्ण (मृत्यू नाही)
२०२० - निरंक
२०२१ - निरंक
...
ऊन वाढले तरी !
एप्रिल, मे, जून हे महिने नागपुरात प्रचंड उष्णतामानाचे असतात. यावर्षी ६ मे हा दिवस सर्वाधिक उष्णतामानाचा ठरला. ४२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. त्याखालोखाल १३ मे रोजी ४१.९ व ५ मे रोजी ४१.८, असे तापमान होते. एप्रिलचा पहिला आठवडाही तापलेला होता. ६ एप्रिलला ४२ अंश सेल्सिअस, तर ७ एप्रिल ४१.८ अंश सेल्सिअस तापमान होते. सध्या आठवडाभरापासून वातावरण बदलले आहे. दोन दिवसांपासून पारा ३७ ते ३८ वर आहे.
...
उन्हाळा घरातच
कोरोना संक्रमणामुळे सारे घरातच असल्याने संपूर्ण उन्हाळा घरातच निघाला. मुलांच्या शाळा भरल्या नाहीत. ऑनलाइन शाळा, ऑनलाइन क्लास आणि ऑफिसही ऑनलाइन अशी स्थिती आहे. महत्त्वाच्या कामासाठीच सकाळी बाहेर पडणे होत असल्याने सारेच सुरक्षित आहेत.
...
कोट
कोरोना संसर्गाच्या भीतीने नागरिकांनी या मागील वर्षी आणि वर्षातही घरातच राहणे पसंत केले. यामुळे दरवर्षी दिसणारे उष्माघाताचे आकडे यंदा दिसले नाहीत. दोन वर्षांपूर्वीची स्थिती नाही.
-दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी
...