सुटीतील गर्दीमुळे कोरोनाचा ग्राफ वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:06 AM2020-11-29T04:06:22+5:302020-11-29T04:06:22+5:30
नागपूर : गणेशोत्सवाप्रमाणे दिवाळीपूर्वीही शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी रस्त्यावर आली. पण या गर्दीतून जेवढी कोरोना संसर्गाची वाढ झाली तेवढी ...
नागपूर : गणेशोत्सवाप्रमाणे दिवाळीपूर्वीही शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी रस्त्यावर आली. पण या गर्दीतून जेवढी कोरोना संसर्गाची वाढ झाली तेवढी वाढ दिवाळीनंतर दिसून आली नाही. परंतु दिवाळीच्या सुटीतील गर्दी कोरोनावाढीस कारणीभूत ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शनिवारी नागपूर जिल्ह्यात ४०१ नवे रुग्ण व ९ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. रुग्णांची एकूण संख्या १,११,१९० झाली असून, मृतांची संख्या ३,६४५ वर पोहचली आहे.
दिवाळीनंतरच्या काळात कोरोनाबाधितांची अंदाजित केलेली वाढ झाली नाही. परंतु चाचण्यांची संख्या वाढलेली आहे. सुटीहून परतलेल्या व लक्षणे असलेल्यांची तपासणी केली जात आहे. आज मात्र मागील चार दिवसाच्या तुलनेत चाचण्यांची संख्या कमी झाली. ५,२७१ चाचण्यांमध्ये ३,७०५ आरटीपीसीआर तर १५६६ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचा समावेश होता. ॲन्टिजेन चाचणीतून ४२ तर आरटीपीसीआर चाचणीतून ३५९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ३३५, ग्रामीणमधील ६४ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ३, ग्रामीणमधील ४ तर जिल्हाबाहेरील ९ आहेत. आज ३३१ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,०२,४८२ वर गेली आहे.
- ३,६३२ कोरोनाचे रुग्ण घरांमध्ये
मेयो, मेडिकल व एम्स या शासकीय रुग्णालयांसह खासगी हॉस्पिटलमध्ये १४३१ कोविडबाधित उपचाराखाली आहेत, तर याच्या दुप्पट ३,६३२ रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांना लक्षणे नसल्याचे किंवा सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरी विलगीकरणात ठेवले आहे. जिल्ह्यात दोन्ही मिळून ५,०६३ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
::कोरोनाची आजची स्थिती
- दैनिक संशयित : ५,२७१
- बाधित रुग्ण : १,११,१९०
_- बरे झालेले : १,०२,४८२
- उपचार घेत असलेले रुग्ण : ५,०६३
- मृत्यू : ३,६४५