कोरोनाचा कहर सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:08 AM2021-03-08T04:08:54+5:302021-03-08T04:08:54+5:30
नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील ७ दिवसांची आकडेवारी सर्वांची धडकी भरवणारी आहे. ७९४१ नव्या रुग्णांची ...
नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील ७ दिवसांची आकडेवारी सर्वांची धडकी भरवणारी आहे. ७९४१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. रविवारी पुन्हा हजारावर रुग्णसंख्या गेली. १,२७१ नवे रुग्ण व ७ मृत्यूंची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १,५७,७२९ तर मृतांची संख्या ४,३९० झाली. कोरोनाचा हा कहर कधीपर्यंत राहील, याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
नागपूर जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ६,६५५ रुग्ण आढळून आले होते. मागील आठवड्यात १२८६ जास्तीच्या रुग्णांची भर पडली. आज सलग सहा दिवसांनी चाचण्यांची संख्या १० हजारांखाली आली. ९३५२ चाचण्या झाल्या. यात ७२७७ आरटीपीसीआर तर २०७५ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीआरमधून ११४२ तर अँटिजेनमधून १२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, ११६० रुग्ण बरे झाल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिला मिळाला आहे. आतापर्यंत १,४२,४८९ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त होण्याचा हा दर ९०.३४ टक्के आहे.
-शहरात १,०३७ तर ग्रामीणमध्ये २३१ बाधित
ग्रामीणच्या तुलनेत शहरात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. आज शहरात १०३७ रुग्ण, ग्रामीणमध्ये २३१ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मृतांमध्ये शहरात ३, ग्रामीणमध्ये १ तर जिल्ह्याबाहेरील ३ मृत्यू आहेत. एकूणच शहरात रुग्णांची संख्या १२५८४२ व २८३० मृत्यू, ग्रामीणमध्ये ३०९२६ रुग्ण व ७८१ मृत्यू आहेत.
-१०,८५० सक्रिय रुग्ण
नागपूर जिल्ह्यात १०,८५० सक्रिय रुग्ण आहेत. यातील २९०९ रुग्ण विविध रुग्णालयांत तर ७९४१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. सक्रिय रुग्णांसोबतच गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने विशेषत: अतिदक्षता खाटा पुन्हा फुल्ल होऊ लागल्या आहेत. सध्याच्या स्थितीत मेडिकलचे ‘आयसीयू’ व ‘एचडीयू’ मिळून ९५ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील ४१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
दैनंदिन चाचण्या : ९३५२
एकूण रुग्ण : १,५७,७२९
सक्रिय रुग्ण : १०,८५०
बरे झालेले रुग्ण : १,४२,४८९
मृत्यू : ४,३९०