नागपुरात कोरोनाचा कहर; २२५ पॉझिटिव्ह, ७ मृत्यू; चार हजाराचा आकडा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:07 AM2020-07-27T11:07:37+5:302020-07-27T11:13:52+5:30
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, सोमवारी सार्वजनिक ठिकाणी गर्दी झाल्यास याचा फायदा होणार नसल्याचे, तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुलै महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या भयावह स्थितीत वाढत आहे. रविवारी कोरोनाचे २२५ नवे रुग्ण व ७ मृत्यूची नोंद झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. रुग्णांची संख्या ४०६२ तर मृतांची संख्या ८३ वर पोहचली आहे. रुग्णांची संख्या २०० वर गेल्याने व गेल्या १४ दिवसापासून मृत्यूसत्र सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मेडिकलच्या दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, २० जुलै रोजी जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६४.०५ टक्के होते, ते आता ६०.५३ टक्क्यांवर आले आहे.
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. लोकांनीही प्रतिसाद दिल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. मात्र, सोमवारी रस्त्यांवर, दुकानात, सार्वजनिक ठिकाणी गर्दी झाल्यास याचा फायदा होणार नसल्याचे, वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व सॅनिटायझेशन महत्त्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. मेयोमध्ये पाच कोविड पॉझिटिव्ह मृत्यूची नोंद झाली. यात लष्करीबाग येथील ६३ वर्षीय महिला, कामठी येथील ४३ वर्षीय पुरुष, बैतुल मध्य प्रदेश येथील ६५वर्षीय पुरुष, शाकील ले-आऊट गोधनी येथील ४९ वर्षीय पुरुष व पाचपावली येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्ण होते. पाचपावली येथील पुरुष रुग्णाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मेडिकलमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यात छत्रपतीनगर कामठी येथील ४५ वर्षीय महिला तर अजनी येथील ४८वर्षीय पुरुष रुग्ण होता. आतापर्यंतच्या मृत्यूमध्ये १५ ग्रामीणमधील, ४८ शहरातील तर २० जिल्ह्याबाहेरील आहेत.
-ग्रामीणमध्ये ५३ तर शहरात १७३ बाधित
ग्रामीण भागात रविवारी ५३ तर शहरात १७३ असे एकूण २२५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात मेयोच्या तून ६८, मेडिकलमधून पाच, एम्समधून ३२, नीरीमधून १३, माफसूमधून १६, खासगी लॅबमधून २२, अॅन्टीजन चाचणीतून ६९ रुग्णांचे कोविड निदान झाले. आज ६७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४५९ झाली आहे. सद्यस्थितीत १५२१ रुग्ण उपचार घेत आहेत. शनिवारी मेडिकलच्या विविध विभागात आठवर रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे ८० वर डॉक्टर व परिचारिकांचे नमुने तपासण्यात आले होते. यातील दोन इन्टर्न डॉक्टर पॉझिटिव्ह आले. धक्कादायक म्हणजे, २० जुलै रोजी रुग्णांची संख्या ३०२७ होती, ६ दिवसात हजार रुग्णांची वाढ होऊन ती ४०६२ वर पोहचली.