दवा बाजारच बनू शकतो कोरोनाचा हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:07 AM2021-03-18T04:07:46+5:302021-03-18T04:07:46+5:30
नागपूर : विदर्भातील सर्वात मोठी औषध बाजारपेठ असलेले संदेश दवा मार्केट व अग्रसेन चौकातील औषध मार्केटचे चित्र बघितल्यावर औषध ...
नागपूर : विदर्भातील सर्वात मोठी औषध बाजारपेठ असलेले संदेश दवा मार्केट व अग्रसेन चौकातील औषध मार्केटचे चित्र बघितल्यावर औषध व्यावसायिकांना व या क्षेत्रात काम करणाऱ्यांना कोरोनाची लागण होत नाही का, असाच प्रश्न पडतोय. दीडशेच्या जवळपास औषध व्यावसायिकांचे येथे प्रतिष्ठान आहेत आणि नागपूरसह विदर्भातून हजारोंच्या संख्येने फार्मासिस्ट येथून औषध घेऊन जातात. पण या मार्केटमध्ये कोरोनाच्या नियमांची कुठलीही जनजागृती नाही आणि येथे येणारे आणि व्यवसाय करणारे ते कृतीतही आणत नाही, असेच काहीसे चित्र आहे.
या दोन्ही मार्केटमध्ये विदर्भातील फार्मासिस्ट, त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी, औषधी कंपनीचे प्रतिनिधी, औषधांची डिलिव्हरी करणारे कामगार, हमाल, होलसेल विक्रेत्यांच्या दुकानातील काम करणारे कर्मचारी असे हजारो लोक या दोन मार्केटमध्ये असतात. सायंकाळच्या सुमारास येथील गर्दी, परिसरात होणाऱ्या पार्किंगच्या वाहनांवरून दिसून येते. काही दुकानात तर २० ते ३० कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. लोकमतने या दोन्ही व्यापारी प्रतिष्ठानांचा आढावा घेतला असता, विक्रेत्यांकडे काम करणारे कर्मचारी, स्वत: काही विक्रेतासुद्धा मास्क न घातलेले आढळले. काहींनी लावलेले मास्क तोंडाच्या खाली घसरलेले दिसले. लिफ्टचा वापर करतानाही सोशल डिस्टन्सिंग दिसून आली नाही. अनेक दुकानांमध्ये सॅनिटायझरदेखील कर्मचारी अथवा औषध खरेदी करणारे फार्मासिस्ट वापरताना दिसले नाही. कोरोनाच्या जनजागृतीचे साधे पोस्टर्ससुद्धा इमारतीत लावलेले दिसले नाही.
- अग्रसेन चौकातील औषध बाजारात सोशल डिस्टन्सिंग नाही
अग्रसेन चौकात असलेल्या औषध बाजारामध्ये दुकानांसमोर वाहनांची पार्किंग, दुकानाचे साहित्य पडलेले असतात. त्यामुळे गल्ल्या अरुंद झाल्या आहेत. सायंकाळच्या सुमारास ग्राहकांची संख्या जास्त असल्याने औषधांच्या खरेदीसाठी रेटारेटीच होते. या रेटारेटीत आपल्यालाही कोरोनाची लागण होऊ शकते, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळावे, अशी जाणीव दिसून आली नाही.
- आम्हालाही वाटते दुकान दुपारी १ वाजता बंद करावे, पण सरकार आमच्यामागे पडले आहे. औषधी या जीवनावश्यक वस्तूंमध्ये येत असल्याने आम्हाला नाईलाज दुकाने सुरू ठेवावी लागत आहे. आम्ही आमच्या पद्धतीने नियमांचे पालन करतो. व्यापाऱ्यांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहनही केले आहे. पण कामात कुठे तरी दुर्लक्ष होते. आम्ही जनजागृतीचे पोस्टर्सही लावले आहे. कदाचित तुम्हाला दिसले नसेल.
हेतल ठक्कर, सचिव, केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन