नागपुरातील मनोरुग्णालय ठरतेय कोरोनाचे नवे हॉटस्पॉट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 10:18 AM2021-03-23T10:18:07+5:302021-03-23T10:21:45+5:30
Nagpur News प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्ण व कर्मचारी पॉझिटिव्ह येऊ लागल्याने हे रुग्णालय कोरोनाचे नवे ‘हॉटस्पॉट’तर ठरणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्ण व कर्मचारी पॉझिटिव्ह येऊ लागल्याने हे रुग्णालय कोरोनाचे नवे ‘हॉटस्पॉट’तर ठरणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सोमवारी पुन्हा दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले तर, १३ ते २१ मार्चदरम्यान सात रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित रुग्णांवर स्वतंत्र वॉर्डात उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मागील वर्षी मनोरुग्णालात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १०० रुग्णांची व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात कुणीच पॉझिटिव्ह आले नव्हते. परंतु आता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले. ते होम आयसोलेशनमध्ये असताना १३ मार्च रोजी वॉर्ड २३ मधील ३२ वर्षीय महिलेला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. दोन दिवसाच्या अंतराने आणखी तीन पुरुष व तीन महिला रुग्ण पॉझिटिव्ह आल्या. दोन कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणे दिसून आल्यावर त्यांची तपासणी केल्यावर सोमवारी ते बाधित असल्याचे निदान झाले. कर्मचारी होम आयसोलेशनमध्ये असून, कोरोनाबाधितांवर स्वतंत्र वॉर्डात उपचार सुरू आहेत.
मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम रुग्णालयात पाळले जातात. दर गुरुवारी नव्या रुग्णांसोबत लक्षणे आलेल्या रुग्णांची कोरोना तपासणी केली जाते. तूर्तास सात रुग्ण व दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णांना लागण कर्मचाऱ्यांकडून झाली असावी, अशी शक्यता आहे.