कोरोनाच्या प्रकोपात महालात लग्नाची वरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:09 AM2021-03-15T04:09:32+5:302021-03-15T04:09:32+5:30
नागपूर : शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना महाल परिसरामध्ये रविवारी सायंकाळी चक्क लग्नाची वरात काढण्यात आली. या वरातीत शंभरावर ...
नागपूर : शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना महाल परिसरामध्ये रविवारी सायंकाळी चक्क लग्नाची वरात काढण्यात आली. या वरातीत शंभरावर वराती सहभागी झाले होते. नागरिक असे बेजबाबदारपणे वागणार असतील तर, या जीवघेण्या आजाराचे नियंत्रण कसे होईल, असा प्रश्न या अक्षम्य कृतीमुळे उपस्थित झाला. हा प्रकार संपूर्ण समाजाला संकटात टाकणारा असल्याने दोषी नागरिकांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण शहर धोक्यात आले आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. शहराला या जीवघेण्या आजारापासून वाचवण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु, काही लोक आताही गंभीर झाले नसून त्यांचे बेजबाबदारपणे वागणे सुरूच आहे. महालमध्ये निघालेल्या लग्नाच्या वरातीत अशाच लोकांचा समावेश होता. शहरात सर्वकाही सुरळीत असल्याप्रमाणे ही वरात काढण्यात आली. वाजंत्री, रोषणाई, घोडीवर नवरदेव आणि त्यांच्यासोबत शंभरावर वराती हे चित्र शासन व प्रशासनाने कोरोना नियंत्रणाकरिता केलेल्या सर्व उपाययोजना पायदळी तुडविणारे होते. वरातीमधील बहुतेक व्यक्तींच्या तोंडावर मास्क नव्हते. शारीरिक अंतराची कुणालाच काळजी नव्हती. सर्वजण एकमेकांना खेटून पुढे जात होते, नाचत होते. ही लग्नाची नाही, तर कोरोनाची वरात आहे, असे मत यावेळी बघ्यांनी व्यक्त केले.