कोरोनाचा काढता पाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:12 AM2021-09-04T04:12:32+5:302021-09-04T04:12:32+5:30
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची घसरण मे महिन्यापासून सुरू झाली असली तरी ऑगस्ट महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या १०च्या आत होती. ...
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची घसरण मे महिन्यापासून सुरू झाली असली तरी ऑगस्ट महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या १०च्या आत होती. तर, या महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्रवारी १ रुग्णाची नोंद झाल्याने नागपूर जिल्ह्यातून कोरोनाने काढता पाय घेतला का, असा प्रश्न विचारला जात आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्याही ५०च्या आत आहे.
नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी ४,५१९ चाचण्या निगेटिव्ह आल्या. यामुळे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. या वर्षात आतापर्यंत ७, १५ व २३ ऑगस्टनंतर शुक्रवारी पुन्हा १ रुग्णाची नोंद झाली. हा रुग्ण शहरातील असून, रुग्णांची एकूण संख्या ३,४०,०९५ तर मृतांची संख्या ५,८९७वर स्थिर आहे. ग्रामीणमध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. रुग्णसंख्या १,४६,१२९ तर मृतांची संख्या २,६०३वर स्थिरावली आहे. आज ४ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ४,८२,८८३ झाली आहे. सध्या ३९ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयांत उपचाराखाली आहेत. २ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
:: कोरोनाची शुक्रवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ४५१८
शहर : १ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण : ४,९३,०४३
ए. सक्रिय रुग्ण : ४१
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,८८३
ए. मृत्यू : १०११९