गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी फिरणारा तरूण ठरला कोरोनाच्या अफवेचा शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 06:53 AM2020-04-13T06:53:40+5:302020-04-13T06:54:05+5:30
नरेश डोंगरे नागपूर : गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी मित्रांकडे पैसे मागण्यासाठी आलेला एक तरुण कोरोना च्या दहशतीतुन निर्माण झालेल्या अफवांचा ...
नरेश डोंगरे
नागपूर : गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी मित्रांकडे पैसे मागण्यासाठी आलेला एक तरुण कोरोना च्या दहशतीतुन निर्माण झालेल्या अफवांचा शिकार ठरला अन नाहकच अलगीकरण कक्षात पोहचला. अस्वस्थ करणारी ही घटना रविवारी दुपारी दोन ते अडीच च्या सुमारास मानेवाडा-बेसा मार्गावर घडली.
संबंधित ३० वर्षांचा हा तरुण वांजरा वस्तीतील रहिवासी आहे. तो सीताबर्डी बाजारात फुटपाथवर बसून चपला जोडे विकतो. त्याची पत्नी गर्भवती आहे. तिला आज कळा आल्यामुळे त्याने तिला डॉक्टर कडे नेले. तपासणी नंतर डॉक्टरांनी त्याला त्याच्या पत्नीची सोनोग्राफी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिवाय काही महागडी औषधेही लिहून दिली. ती खरेदी करण्यासाठी आणि सोनोग्राफीसाठी संबंधित तरुणांकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या एका मित्राला फोन केला आणि पैसे उधार मागितले. मित्राने त्याला मानेवाडा मार्गाने नरेंद्रनगर चौकाजवळ येण्यास सांगितले. त्यानुसार हा तरुण आज दुपारी दोन च्या सुमारास मानेवाडा चौकाजवळ पोहोचला. या भागात पोलिसांची नाकाबंदी होती. आपण पोलिसांच्या हाती लागल्यास आपल्याला दंडे पडतील, ही कल्पना आल्यामुळे तो बाजूच्या वस्तीत शिरला आणि एका गल्लीत दडून बसला. बऱ्याच वेळापासून तो तेथे दडून दिसल्याने आजूबाजूच्यांना संशय आला. त्यांनी त्याच्याभोवती गर्दी केली. कुठून आला काय आला अशी विचारणा झाली. त्याने आपण कोठे राहतो काय राहतो हे सांगण्याऐवजी एका विशिष्ट वस्तीतून आल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांना भलताच संशय आला. सभोवताल मोठी गर्दी झाल्यामुळे आणि प्रश्नांचा भडिमार होत असल्याने तो घाबरला. त्यात त्याला खोकल्याची उबळ आली. तो इकडे तिकडे थुंकू लागला ते पाहून नागरिकांना तो कोरोनाग्रस्त असावा, असा संशय आला. त्यांनी अजनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्याच्याभोवती जमलेल्या पैकी काहींनी हा व्यक्ती खूप वेळापासून इथे दडून असल्याचे तसेच तो इकडेतिकडे खोकलून थुंकत असल्याचे सांगितले. नागरिकांचा रोष लक्षात घेत पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस सुरु केली. वरिष्ठांनाही माहिती कळविली.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे तो तरूण अधिकच घाबरला. जोरजोरात खोकलू लागला. त्याची एकूणच अवस्था पाहून पोलिसांनाही वेगळाच संशय आला. त्यांनी लगेच मेडिकलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ॲम्बुलन्स मागून घेतली. ॲम्बुलन्स मधून आलेल्या पथकाने या तरुणाला ताब्यात घेऊन त्याला सरळ आमदार निवासातील अलगीकरण कक्षात नेले. तेथे त्याला क्वॉरेंटाईन करण्यात आले.
दरम्यान, या घटनेच्या संबंधाने शहरात वेगवेगळ्या अफवा पसरल्या. सोशल मीडियावरही अवास्तव मेसेज फिरू लागले त्याची गंभीर दखल घेत परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त निर्मला देवी आणि अजनीचे ठाणेदार संतोष खांडेकर लगेच घटनास्थळी धावले त्यांनी संबंधित तरुणाची चौकशी केली. त्यांनी सांगितलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी त्याच्या मित्राशी संपर्क साधण्यात आला. नंतर पत्नीशी आणि तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला. या सर्वांनी दिलेली माहिती पोलीस अधिकाऱ्यांना अस्वस्थ करणारी ठरली. कारण गर्भवती पत्नी ची सोनोग्राफी करण्यासाठी आणि तिचा औषध उपचार करण्यासाठी त्याने आपल्या मित्राला पैसे उधार मागितले अन मित्राने दिलेल्या पत्त्याऐवजी तो दुसरीकडे पोहचला. तेथे पोलिसांना पाहून घाबरला. नंतर हा घटनाक्रम घडल्याचे अधिकाऱ्याच्या लक्षात आले.
हा तरुण आता अलगीकरण कक्षात पोहोचल्याने त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. तिच्या उपचाराचा अन खाण्या पिण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
..…
अफवा पसरवणाऱ्या चा शोध सुरू
हा तरुण कोरोना पसरवण्यासाठी या वस्तीत आला होता आणि इकडे थुंकत होता, अशी अफवा पसरली होती ती अफवा कुणी पसरवली त्याचा आम्ही शोध घेत असल्याचे पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांनी लोकमतला सांगितले.
----