नागपूर मनपाच्या अर्थसंकल्पावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 06:37 PM2020-05-06T18:37:11+5:302020-05-06T18:47:45+5:30
महापालिकेचा सन २०२० -२१ या वर्षाचा अर्थसंकल्प लॉकडाऊन सुरू असल्याने सादर करता आला नाही. १७ मेनंतर लॉकडाऊन न हटल्यास जून महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी झलके यांनी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महापालिकेचा सन २०२० -२१ या वर्षाचा अर्थसंकल्प लॉकडाऊन सुरू असल्याने सादर करता आला नाही. १७ मेनंतर लॉकडाऊन न हटल्यास जून महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी झलके यांनी सुरू केली आहे. मात्र लॉकडाऊनचा परिणाम मनपाच्या उत्पन्नावर होणार आहे. दुसरीकडे प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर होणाऱ्या खर्चाचा मोठा बोजा मनपाच्या तिजोरीवर पडत असल्याने अर्थसंकल्पावर कोरोनाचे सावट राहणार आहे.
माजी अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी २०१९-२० या वर्षाचा ३,१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थसंकल्पात मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली होती. सिमेंट रोडसाठी २०० कोटी, केळीबाग रोड, जुना भंडारा रोड, उड्डाणपूल यासाठी ६७२. ७४ कोटी, डांबरी रस्ते १०४ कोटी, खड्डे बुजवण्यासाठी २५.५५ कोटी, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या प्रकल्पात मनपाचा वाटा देण्यासाठी तरतूद करण्यात आली होती. मात्र मनपाच्या बिकट आर्थिक स्थितीचा विचार करता आयुक्तांनी विकास कामांना ब्रेक लावले. अर्थसंकल्पातील प्रस्तावित विकासकामे कागदावरच राहिली.
दुसरीकडे लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यात मालमत्ता कर, पाणी कर, बाजार विभागाच्या वसुलीवर परिणाम झाला. मालमत्ता करापासून ४४३.७० कोटी अपेक्षित असताना २५० कोटीपर्यंतच हा आकडा पोहचला. नगररचना विभागामुळे मात्र मनपाला मोठा दिलासा मिळाला. ९४.९१ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना १९८ कोटींची वसुली झाली. परंतु मागील दोन महिन्यात नगररचना विभागाच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती विचारात घेता मनपाला विशेष अर्थसाहाय्य मिळण्याची शक्यता दिसत नाही.
आयुक्तांनी लावली कात्री
मनपा आयुक्तांनी २०१९-२० या वर्षाचा सुधारित अर्थसंकल्प २,६९८.३५ कोटींचा सादर केला. परंतु अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच आयुक्तांनी विकासकामांना कात्री लावली होती. मनपावरील दायित्व व उत्पन्न यांचा विचार करता यात मोठी तफावत आहे. वित्त वर्षातही त्यात फारशी सुधारणा होण्याची शक्यता नाही.
अर्थसंकल्पाची तयारी सुरू
शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी अर्थसंकल्प लॉकडाऊन संपल्यानंतर जून महिन्यात सादर केला जाईल. अर्थसंकल्पाची तयारी सुरू असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली. वास्तविक एप्रिल महिन्यातच अर्थसंकल्प सादर करण्याचा झलके यांचा विचार होता. परंतु लॉकडाऊनमुळे अर्थसंकल्प सादर करता आलेला नाही.