कोरोनाचा धोका, तरीही नियम धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 10:37 AM2021-02-26T10:37:30+5:302021-02-26T10:39:27+5:30
Nagpur News प्रशासनाने हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवरदेखील प्रतिबंध लावले असून, रात्री ९ वाजेपर्यंतची मर्यादा घालून दिली आहे. शहरातील बहुतांश रेस्टॉरंट्स चालकांकडून त्याचे पालनदेखील होत असले तरी, काही अतिआगाऊ मालकांकडून याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने प्रशासनाने हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवरदेखील प्रतिबंध लावले असून, रात्री ९ वाजेपर्यंतची मर्यादा घालून दिली आहे. शहरातील बहुतांश रेस्टॉरंट्स चालकांकडून त्याचे पालनदेखील होत असले तरी, काही अतिआगाऊ मालकांकडून याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. नियमाला धाब्यावर बसवून छुप्या पद्धतीने ग्राहकांना प्रवेश दिला जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असतानादेखील त्यांना कशाचीही भीती नसल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात शहरात पाहणी केली असता वरील चित्र दिसून आले.
हॉटेल्स व रेस्टॉरंट्स ५० टक्के क्षमतेने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासच परवानगी देण्यात आली आहे. मात्र दिवसा अनेक ठिकाणी ५० टक्क्याहून जास्त ग्राहक दिसून आले. अनेक ठिकाणी अद्यापही ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ कायम राहील, अशी व्यवस्था झालेली नाही. गुरुवारपासून सर्वच निर्बंध कडकपणे लागू झाल्याने हॉटेल व रेस्टॉरंट्स चालकदेखील त्याचे पालन करतील व रात्री ९ नंतर ग्राहकांना प्रवेश बंद होईल, अशी अपेक्षा होती. परंतु अनेक ठिकाणी याचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.
मुख्य दरवाजा बंद, ग्राहकांना प्रवेश
रामदासपेठेतील काही रेस्टॉरंट्स सुरू होती. पार्सल देण्याच्या नावाखाली छुप्या पद्धतीने ग्राहकांना आत प्रवेश दिला जात होता. सिद्धिविनायक नावाच्या रेस्टॉरंटमध्ये तर रात्री ९.३० नंतर ग्राहकांना आत घेण्यात आले व चक्क त्यांची ऑर्डरदेखील घेण्यात आली. मुख्य दरवाजा बंद करून व बाहेरील लाईट्स बंद करून हा प्रकार सुरू होता.
दुकाने उघडी कशी?
मनपा आयुक्तांनी २२ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार दुकानेदेखील रात्री ९ पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु अनेक किराणा व डेलीनीड्सची दुकाने रात्री १० नंतरदेखील उघडी होती. यात इतवारी, पंचशील चौक, धंतोली, महाल येथील काही दुकानांचा समावेश होता. या दुकानांवर कारवाई का झाली नाही, हा प्रश्न आहे.
पानटपऱ्या सुरू कशा?
शहरातील काही भागात पानटपऱ्या बिनधास्तपणे सुरू असल्याचे चित्र होते. यात रामदासपेठ, पंचशील चौक, महाल, इतवारी येथील पानटपऱ्यांचा प्रामुख्याने समावेश होता. तेथे लोकांची गर्दीदेखील होती.
पोलीस ठाण्याजवळच नियमाचा फज्जा
शुक्रवार तलावाजवळच्या भागात रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांचे ठेले लागतात. या ठिकाणी दोन डझनाहून अधिक लोकांची गर्दी होती. ग्राहक ‘सोशल डिस्टन्सिंग’शिवाय बसले होते. आश्चर्याची बाब म्हणजे गणेशपेठ पोलीस ठाणे येथून फारसे दूर नाही. मात्र तरीदेखील खुलेआमपणे येथे लोकांची गर्दी झाली होती. तेथे काही लोकांची हुल्लडबाजीदेखील सुरू होती व लोकमतच्या चमूला फोटो काढण्यापासून थांबविण्याचादेखील प्रयत्न झाला.
मोमिनपुऱ्यात रेस्टॉरंट्स बंद, तरीही लोकांची गर्दी
मोमिनपुरा परिसरात रेस्टॉरंट्स चालकांनी नियमाचे पालन करत ९ वाजता ‘शटर’ बंद केले. मात्र मुख्य रस्त्यावर लोकांची गर्दी खूप जास्त होती. अनेक जण विना मास्कचे फिरत होते व ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडाल्याचे चित्र होते. पोलिसांचे ‘पेट्रोलिंग’ सुरू होते, मात्र कुणालाही टोकण्यात येत नव्हते.