कोरोनाच्या काळात नाटक, गायकांना ‘स्टुडिओ’चा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 08:10 PM2020-09-07T20:10:33+5:302020-09-07T20:12:02+5:30
महाराष्ट्रात कोरोनाच्या आगमनाला सात महिने पूर्ण होत आहेत आणि कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीने संपूर्ण अर्थव्यवस्था मोडकळीस येण्याच्या घटनेला सहा महिने पूर्ण होत आहेत. इतर सर्वच औद्योगिक क्षेत्रांप्रमाणेच व्यापारही मोडकळीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाच्या आगमनाला सात महिने पूर्ण होत आहेत आणि कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीने संपूर्ण अर्थव्यवस्था मोडकळीस येण्याच्या घटनेला सहा महिने पूर्ण होत आहेत. इतर सर्वच औद्योगिक क्षेत्रांप्रमाणेच व्यापारही मोडकळीस आला. सांस्कृतिक क्षेत्र तर पूर्णपणे जायबंदीच झाले. अशा स्थितीत कलावंतांच्या कलेला आणि त्यावाटे होणाऱ्या आर्थिक उलाढालीला नवे आयाम जोडावे लागत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांना ऑनलाईनचा पर्याय शोधावा लागला आहे. गायनाचे कार्यक्रम वेगवेगळ्या सोशल माध्यमांवर होतच आहेत. आता नाट्यप्रयोगही ऑनलाईन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी अत्याधुनिक स्टुडिओजची निर्मिती व्हायला लागली आहे.
ज्याप्रमाणे बरेच सिनेमे या काळात ओटीटी (ओव्हर दी टॉप सर्व्हिस) प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊन, किमान नफा आणि गुंतवणूक काढण्यावर भर देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नाटकांसाठीही ओटीटी पर्यायाचा विचार सुरू झाला होता. यासाठी नाट्यसंस्थांनी या सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांशीही विचारविनिमय करण्यास सुरुवात केल्याचे कळते. हे प्रयत्न कितपय यशस्वी ठरतात, हे येणारा काळच ठरवेल. तुर्तास राज्याच्या ज्या भागात मोठ्या संख्येने नाट्यरसिक व रंगकर्मी आहेत, त्या भागात नाट्यनिर्मात्यांनी स्टुडिओज उभारण्यास सुरुवात केली आहे. नागपुरातही अशा प्रकारच्या दोन ते तीन स्टुडिओजची निर्मिती झालेली आहे. सध्या या स्टुडिओजमध्ये गायनाचे कार्यक्रम जोमाने सुरू आहेत. येणाऱ्या काळात नाटकांचीही तयारी केली जात आहे. या स्टुडिओजच्या माध्यमातून हे लाईव्ह उपक्रम जगभरात पोहोचण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यासाठीची यंत्रणाही या स्टुडिओजमध्ये लावण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हे कार्यक्रम नि:शुल्क आणि स:शुल्क, अशा दोन्ही प्रकारात चालविले जातात. त्यासाठी ऑनलाईन तिकीट, तिकीट खरेदी करणाऱ्यालाच पाठवायची लिंक, जगभरातील वेळेचे मार्गदर्शन आणि त्या त्या ठिकाणी असणारा प्रेक्षकवर्ग हे सगळे शोधण्याचे काम या स्टुडिओजमार्फतच केले जात आहे. या व्यवस्थेमुळे, स्थानिक कलावंतांना थेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होण्याची शक्यता असून, त्यांची कला जगभरात पोहोचण्याची सुविधाही होत आहे.
लाईव्ह आणि रिले प्रकारात सुविधा
स्टुडिओजमध्ये रंगमंच, एक ते तीन कॅमेरे, लाईट्स, ध्वनी संयोजन, गरज असेल तर लाईव्ह क्रोमा-ग्राफिक्स अशा सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. शिवाय, ज्या नाट्यसंस्थांना अथवा संगीत संस्थांना कार्यक्रम लाईव्ह करण्याची इच्छा असेल त्यांना तशी सुविधा किंवा ज्यांना शुटिंग-एडिटिंग करून कार्यक्रम सादर करायचे, तशी सुविधा पुरविण्यात येत आहे.