टंचाईच्या कामांना कोरोनाची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:09 AM2021-05-06T04:09:15+5:302021-05-06T04:09:15+5:30
नागपूर : दरवर्षी जिल्ह्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातच ५१ कोटी रुपयाचा टंचाई आराखडा तयार करण्यात ...
नागपूर : दरवर्षी जिल्ह्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातच ५१ कोटी रुपयाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला. यातील बहुतांश कामे जून महिन्याच्या आत पूर्ण करावयाची आहेत. परंतु मे महिना सुरू झाला असताना अद्याप टंचाई आराखड्यातून कामेच सुरू झाली नसल्याचे दिसत आहे. टंचाईच्या कामाला कोरोनाची झळ बसल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.
नागपूर जिल्हा परिषदेने यावर्षी ५१.२६ कोटी रुपयाचा टंचाई आराखडा तयार केला. यात २,५८० कामे १,०२६ गावात प्रस्तावित करण्यात आले. टंचाईच्या कामात नवीन विंधन विहिरी, नळ योजनांची दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे, झिरे बुडक्या खोदणे आदी कामांचा समावेश आहे. ५१ कोटी रुपयाच्या आराखड्यापैकी जिल्हाधिकाऱ्यांनी २१.५३ कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी दिली आहे. ४७५ गावांमध्ये यातील ६११ कामे होणार आहेत. परंतु सध्या १५ गावात १८ कामे प्रगतिपथावर आहेत. टंचाईच्या कामाची गती लक्षात घेता, पावसाळा सुरू झाल्यावरही टंचाईची कामे सुरूच राहील असे दिसत आहे. दुसरीकडे ग्रामस्थांकडून ओरड सुरू झाली आहे.
- सध्या कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक कामांवर परिणाम झाला आहे. अधिकाऱ्यांची सेवा जिल्हा प्रशासनाने कोरोनासाठी घेतली आहे. स्टॅम्प पेपर उपलब्ध होत नसल्याने ग्रामपंचायतशी टंचाईचे करार थांबले आहे. संचारबंदीची झळ टंचाईच्या कामाला बसली आहे.
रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि.प.