लग्न ठरताहेत कोरोनाचे संक्रमण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:09 AM2021-03-18T04:09:17+5:302021-03-18T04:09:17+5:30
रामटेक : रामटेक तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढत आहे. ग्रामीण भागात आजही मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन ...
रामटेक : रामटेक तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढत आहे. ग्रामीण भागात आजही मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. यासोबतच गत महिनाभरापासून घरी होणारे लग्न संक्रमणाचे प्रमुख कारण ठरीत असल्याचे दिसून येत आहे. रामटेक तालुक्यात १६ मार्चच्या आकडेवारीनुसार ८८६ कोरोना पाझिटिव्ह हे ग्रामीण भागातील आहेत. यातील ७२८ बरे झाले आहेत. शहरात आतापर्यंत ४११ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील ३५७ बरे झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ४६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पंचाळा (बु) येथे बुधवारी एका ६० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या वाढण्यास लग्न समारंभ व आठवडी बाजार कारणीभूत ठरले आहेत. ग्रामीण भागातील अनेक नागरिक छोटे दुकान घेऊन बाजारात ठिकठिकाणी जात असतात. तेथे कुणीही मास्क घालत नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत नाही. कोरोना संक्रमणाबाबत ग्रामीण भागात नागरिक बेफिकीर आहेत. त्यांची कोरोनाबाबतची भीती कमी झाल्याने संक्रमण वाढल्याचे रामटेक तालुका आरोग्य अधिकारी चेतन नाईकवार यांनी सांगितले.
हिवरा भेंडे येथे तहसीलदार व आरोग्य विभागाची टीम गेली असता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी भांडण केली. नागरिक जर मास्क घालत नसतील व प्रतिबंधात्मक नियम पाळत नसतील तर संक्रमण साखळी तुटेल कशी, असा सवालही नाईकवार यांनी उपस्थित केला. शहरात नगरपालिकेच्या वतीने कोरोनाप्रतिबंधात्मक मोहीम राबविली जात आहे. मास्क वापरला नाही तर दंड ठोकला जातो. पण ग्रामपंचायत क्षेत्रात यातले काहीही होताना दिसत नाही.