कोरोनाबाधित महिलेची एम्स हॉस्पिटलच्या पाचव्या माळ्यावरून उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:08 AM2021-05-08T04:08:11+5:302021-05-08T04:08:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एम्स हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये भरती असलेल्या एका कोरोनाबाधित महिलेने पाचव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एम्स हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये भरती असलेल्या एका कोरोनाबाधित महिलेने पाचव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे हॉस्पिटल प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. रेणुका रमेश अलधरे (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या टाकळघाटच्या कॉलनी नंबर २ मध्ये राहत होत्या. रेणुका यांच्यावर एम्सच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारपासून त्यांची मानसिक स्थिती बिघडली. त्या चिडचीड करत असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांचे समुपदेशनही केले होते. गुरुवारी रात्री ७.४५ च्या सुमारास त्यांनी पाचव्या माळ्याच्या खिडकीतून खाली उडी घेतली. दुसऱ्या माळ्याच्या टेरेसवर पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये एकच खळबळ उडाली. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच सोनेगावचे ठाणेदार दिलीप सागर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रेणुका यांचे नातेवाईक तसेच डॉक्टरांकडे आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी केली. त्यानंतर विनोद आत्माराम कोरे यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----
विद्यार्थ्यांसह तिघांचा अकस्मात मृत्यू
नागपूर : कोरोनाची बाधा झाल्यामुळे एका विद्यार्थ्यांसह तिघांचा अकस्मात मृत्यू झाला. सोनेगावच्या भेंडे ले-आऊटमध्ये राहणारा संकेत संजयकुमार पांडा (वय २२) हा गुरुवारी त्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आला. संकेतचे वडील ओडिशात नोकरी करतात. त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे संकेतची आई तिकडे गेली होती. एमबीएची तयारी करीत असलेला संकेत घरी एकटाच होता. त्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाल्यामुळे तो घरीच उपचार घेत होता. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास त्याला औषध आणि डबा घेऊन येणाऱ्याने आवाज दिले. प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून आजूबाजूच्यांनी सोनेगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता संकेत मृतावस्थेत दिसून आला. श्रीकांत केशवराव दौंड यांनी दिलेल्या माहितीवरून सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
अशाच प्रकारे सोमलवाडात बुद्धविहाराजवळ राहणारे भन्तेजी ताराचंद लक्ष्मण गजभिये (वय ६८) हेसुद्धा मृतावस्थेत आढळून आले. गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्यांनी पोलिसांना माहिती दिली. सचिन मनोहरराव गोले यांनी दिलेल्या माहितीवरून सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. भन्तेजींचा मृत्यू कोरोनामुळे झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.
तिसरी अशीच घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्राइड हॉटेलमागे घडली. शेखर वानखेडे नामक व्यक्ती त्याच्या रूममध्ये शुक्रवारी दुपारी मृतावस्थेत आढळून आले. सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
--