कोरोनानंतर लहान मुलांमध्ये दिसून येत आहे ‘एमआयएस’ आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:07 AM2021-05-16T04:07:47+5:302021-05-16T04:07:47+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : एकीकडे कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी लढा दिला जात असताना दुसरीकडे लहान मुलांमध्ये एक नवीन आजार ...
सुमेध वाघमारे
नागपूर : एकीकडे कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी लढा दिला जात असताना दुसरीकडे लहान मुलांमध्ये एक नवीन आजार दिसून येऊ लागला आहे. कोरोनातून बाहेर पडणाऱ्या मुलांमध्ये ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिन्ड्रोम’चा धोका वाढला आहे. मेडिकलमध्ये मागील चार महिन्यांत जवळपास १२, तर कलर्स हॉस्पिटलमध्ये सात रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक, दुसऱ्या लाटेत तरुण, तर तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तज्ज्ञानुसार, महाराष्ट्रात आढळून आलेला कोरोनाचा ‘डबल म्युटंट’ विषाणू अधिक तीव्रतेने पसरणार आणि अधिक संसर्ग क्षमतेचा आहे. त्यामुळे मुलांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. याला गंभीरतेने घेऊन आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. परंतु याच दरम्यान कोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिन्ड्रोम’ (एमएसआय) दिसून येत असल्याने चिंता वाढली आहे.
पहिल्या २४ तासांमध्ये ‘हाय ग्रेट फिवर’
‘लोकमत’शी बोलताना वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर म्हणाले, हा आजार कोरोनाशी मिळताजुळता आहे. या आजाराच्या मुलांमध्ये पहिले २४ तास ‘हाय ग्रेट फिवर’ सोबत नसा आणि स्रायूंमध्ये सूज येणे, पोट दुखणे, उलट्या, हगवण व पोट फुगणे तसेच पल्स (नाडी) वेगाने चालणे आदी लक्षणे दिसून येतात. याकडे पालकांनी व डॉक्टरांनी लक्ष देणे महत्त्वाचे असते. या आजारावर वेळेत उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. ही लक्षणे इतरही आजारांमध्ये दिसून येत असल्याने गोंधळ उडण्याची शक्यता असते. ‘कलर्स’ हॉस्पिटलमध्ये या आजराची सात मुले असून ती २ ते १६ वर्षांच्या आतील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला घेऊन ‘अलर्ट’ जारी केला आहे.
केस-एक : डेंग्यू व कावीळशी मिळती जुळती लक्षणे होती
बुटीबोरी येथील रहिवासी तीन वर्षांचा रोहन डॉ. खळतकर यांच्याकडे आला तेव्हा त्याला खूप जास्त ताप होता. पोट फुगलेले होते. यकृत निकामी होण्याचा पातळीवर पोहोचले होते. त्याची नाडी १८० दरम्यान होती. प्लेटलेट कमी झाल्या होत्या. तो अर्धवट बेशुद्धावस्थेत होता. लघवीचे प्रमाण कमी होऊन मूत्रपिंडावर त्याचा प्रभाव पडला होता. रक्तदाब कमी होता. एकूणच डेंग्यू व कावीळसारखी लक्षणे होती. कोरोनाची आरटीपीसीआर व अँटिजन चाचणी केल्यावर ती निगेटिव्ह आली. मात्र रक्ताच्या तपासणीत त्याच्या अँटिबॉडी वाढलेल्या होत्या. इतरही चाचण्या करून ‘मल्टि सिस्टम इन्फ्लेमेटरी सिन्ड्रोम’चे निदान करण्यात आले. तातडीच्या औषधोपचाराने रोहन या आजारातून बरा होत आहे.
लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जा
या आजारामुळे शरीरात ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’ म्हणजे ‘टॉक्सिक’ उत्पन्न होऊ लागते. याचा प्रभाव हृदय, मूत्रपिंड, यकृत सांरख्या महत्त्वपूर्ण अवयवांवर पडतो. यामुळे लक्षणे दिसताच डॉक्टरांना दाखवायला हवे. रक्तचाचणीतून या आजाराचे निदान करून उपचार केला जातो.
-डॉ. वसंत खळतकर वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ
-ही आहेत लक्षणे
पहिल्या २४ तासांत तीव्र स्वरूपातील ताप, उलट्या होणे, पोट दुखणे, हगवण, हृदयाचे ठोके वाढणे, अंगावर लाल चट्टे येणे, अशक्तपणा वाटणे, श्वास लागणे, डोके दुखणे, गाठी येणे, चिडचिडेपणा वाढणे, प्लेटलेट कमी होणे.