कोरोनामुळे सुटीचा परिणाम : नागपुरात शाळांमध्ये शुकशुकाट, कोचिंंग क्लासेसही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:43 AM2020-03-17T00:43:47+5:302020-03-17T00:45:14+5:30
कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व शाळा-महाविद्यालये, कोचिंंग क्लासेसना सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व शाळा-महाविद्यालये, कोचिंंग क्लासेसना सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट होता. आरोग्य विभागातर्फे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले. तरीही उद्याने गर्दीने फुलली होती.
शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा आदेश शनिवारी जारी करण्यात आला होता. त्यामुळे बहुतांश शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सोमवारपासून सुटी असल्याचे कळविले होते. काही शाळांचा विद्यार्थ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळेत आले. शाळेला सुटी जाहीर करण्यात आल्याचे शिक्षकांनी सांगितल्यानंतर विद्यार्थी आल्यापावली परत गेले. हुडकेश्वर मार्गावरील एका शाळेत दहावीचा पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी होती. धनगवळी नगरातील एका प्ले ग्रुप ते केजी टू पर्यंत असलेल्या कॉन्व्हेंटने विद्यार्थ्यांना सुटी असल्याचे कळविले नव्हते. त्यामुळे या कॉन्व्हेंटमध्ये पालक आपल्या चिमुकल्यांना सोडण्यासाठी येताना दिसले. मानेवाडा रिंग रोडवरील एका शाळेत सुटीची कल्पना नसल्यामुळे विद्यार्थी शाळेत आले, परंतु सुटी असल्याचे कळताच ते आपल्या घरी निघून गेले. नंदनवनमधील बहुतांश कोचिंग क्लासेस रविवारपासून बंद असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकाने सांगितले. तर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या एका कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांना शिकविणे सुरु होते. तेथील संचालकांना विचारणा केली असता त्यांनी शनिवारी उशिरा आदेश मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना कळविणे शक्य झाले नाही असे सांगितले. दुपारपासून आम्हीही क्लास बंद करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भांडेप्लॉट चौक, नवीन सुभेदार ले आऊट परिसरातील कोचिंग क्लासेसही बंद असल्याचे चित्र दिसले.
गार्डनमध्ये नागरिकांची गर्दी
शहरातील बहुतांश गार्डन सुरू असल्याचे चित्र सोमवारी दिसले. सुभेदार ले आऊट परिसिरातील दत्तात्रयनगर येथील उद्यानात सकाळी नागरिक आले होते. परंतु नेहमीपेक्षा नागरिकांची संख्या खूप कमी होती. धंतोलीतील ट्राफिक पार्कमध्येही पालक आपल्या मुलांना घेऊन आल्याचे चित्र दिसले. शंकरनगरमधील उद्यानातही तरुण, ज्येष्ठ नागरिक आले होते. रामदासपेठच्या दगडी पार्कमध्येही नागरिक आले होते.
काही मॉल बंद
शहरातील मॉल, सिनेमा थिएटरसुद्धा बंद ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या निर्देशाचे पालन थिएटर चालक करीत आहेत. काही मॉलही बंद ठेवण्यात आले आहे. पण काही मॉल चालकांनी शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे सोमवारी दिसून आले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे.