Coronavirus :हजारो प्रवाशांच्या आरोग्याबाबत रेल्वे प्रशासनाची उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 01:02 AM2020-03-13T01:02:40+5:302020-03-13T01:03:11+5:30
कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण नागपुरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. परंतु रेल्वे प्रशासन या प्रवाशांच्या आरोग्याबाबत उदासीन असल्याची स्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण नागपुरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. परंतु रेल्वे प्रशासन या प्रवाशांच्या आरोग्याबाबत उदासीन असल्याची स्थिती आहे. रेल्वेस्थानकावर कोरोनाच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नाही. केवळ प्रवाशांमध्ये जागृती करण्याचे काम रेल्वे प्रशासन करीत आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज १५० प्रवासी गाड्या ये-जा करतात. प्रवाशांची संख्याही ४० ते ४५ हजारावर आहे. कोरोनाबाबत रेल्वे प्रशासनाने आठ दिवसांपासून प्रवाशामध्ये स्टीकर, बॅनरच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. ध्वनिक्षेपकाहूनही प्रवाशांना दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. परंतु रेल्वेस्थानकावर देशाच्या चारही दिशांनी रेल्वेगाड्या येतात. यात कोरोनाचे रुग्ण असलेल्या राज्यातूनही रेल्वेगाड्या ये-जा करतात. अशास्थितीत कोरोनाचे संशयित रुग्ण रेल्वेस्थानकावर येण्याची शक्यता आहे. कोरोनाचे लक्षण वाटल्यास तपासणी करण्याची सुविधा प्रशासनाने रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. केवळ प्रवाशांमध्ये जागृती करण्यात येत आहे. बाहेरच्या राज्यातून कोरोनाचा एखादा संशयित रुग्ण रेल्वेस्थानकावर आल्यास त्याला तपासण्याची कुठलीच यंत्रणा नसल्यामुळे असा रुग्ण थेट रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर कोरोनाच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी पूर्वेकडील संत्रा मार्केट भागात आणि पश्चिमेकडील भागात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोरोनाची तपासणी व्हावी
‘कोरोना व्हायरसचा रुग्ण इतरांच्या संपर्कात आल्यास त्याचा इतरांना प्रादुर्भाव होतो. रेल्वेस्थानकावर हजारो प्रवासी येतात. मात्र, येथे कोरोनाची तपासणीच होत नाही, ही गंभीर बाब आहे. रेल्वे प्रशासनाने त्वरित कोरोनाच्या तपासणीची सुविधा रेल्वेस्थानकावर उपलब्ध करणे गरजेचे आहे.’
योगेश चौधरी, रेल्वे प्रवासी नागपूर
केवळ जनजागृती करून उपयोग नाही
‘रेल्वे प्रशासन कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करीत आहे. परंतु ही बाब पुरेशी नाही. एखाद्या प्रवाशाला कोरोनाची लक्षणे असल्यास आणि तो दूर अंतरावरून प्रवास करून रेल्वेस्थानकावर उतरल्यास त्याला तपासण्याची सुविधा रेल्वेस्थानकावर असणे गरजेचे आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने या गंभीर आजाराबाबत सावध होणे आवश्यक आहे.’
लालटू सिंग, प्रवासी कोलकाता
रेल्वेस्थानकावर तपासणीबाबत अद्याप सूचना नाहीत
‘कोरोनाची लक्षणे आढळल्यास प्रवाशांनी त्वरित उपस्टेशन व्यवस्थापक, रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, अशा सूचना ध्वनिक्षेपकाहून करण्यात येत आहेत. कोरोनाची लक्षणे वाटत असल्यास आणि अशा प्रवाशाने संपर्क साधल्यास त्याचे नमुने रेल्वे रुग्णालयात घेऊन ते खासगी रुग्णालयात पाठविण्याची सुविधा करण्यात आली आहे. रेल्वेस्थानकावर कोरोनाच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्याबाबत रेल्वे मुख्यालयाकडून कोणत्याच सूचना मिळालेल्या नाहीत. याबाबत सूचना मिळाल्यास रेल्वेस्थानकावर तपासणीची सुविधा उपलब्ध करण्यात येईल.’
एस. जी. राव, प्रभारी जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग.