Coronavirus : नागपूर विमानतळावर केवळ विदेशी प्रवाशांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:50 AM2020-03-13T00:50:29+5:302020-03-13T00:52:02+5:30
विदेशात गेलेला भारतीय प्रवासी मुंबई आणि दिल्ली विमानतळावर उतरून तेथून विमानाने नागपुरात आल्यानंतर कोरोना विषाणूच्या प्रतिबंधक तपासणीविना शहरात दाखल होत असल्याने कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशांतर्गत विमानाने नागपुरात येणाऱ्या प्रवाशांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी करण्यात येत नाही. त्यामुळे विदेशात गेलेला भारतीय प्रवासी मुंबई आणि दिल्ली विमानतळावर उतरून तेथून विमानाने नागपुरात आल्यानंतर कोरोना विषाणूच्या प्रतिबंधक तपासणीविना शहरात दाखल होत असल्याने कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशीच घटना नागपुरात एका प्रवाशासंदर्भात घडली आहे. अमेरिकेतून मुंबईत आणि मुंबईतून नागपुरात दाखल झालेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
नागपुरात दोहा-नागपूर आणि शारजाह-नागपूर या दोन थेट विमानसेवा आहेत. पण विदेशातून देशातील विमानतळावर उतरल्यानंतर तेथून नागपुरात विमानाने दाखल होणारे अनेक प्रवासी आहेत. अशा प्रवाशांना घरगुती प्रवासी समजून त्यांची विमानतळावर तपासणी करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अधिकारी म्हणाले, विमानतळ प्रशासनाला ५ मार्चच्या रात्री केंद्रीय मंत्रालयाकडून आदेश आल्यानंतर त्वरित विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) विमानतळावर हेल्प डेस्क स्थापन केला आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाचे दोन डॉक्टर, दोन पॅरामेडिकल स्टॉफ, नर्स आणि एमआयएलचे अधिकारी तैनात आहेत. त्यांच्यातर्फे प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. संशयित प्रवाशाला बाहेर काढून त्याला पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. विमानतळावर सर्व प्रकारची सतर्कता बाळगण्यात येत आहे. मध्यरात्रीनंतर दोहा आणि शारजाह येथून येणाऱ्या सर्व प्रवाशांची डॉक्टरांतर्फे अद्ययावत उपकरणांद्वारे तपासणी करण्यात येत आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना थर्मल स्कॅनिंग केल्यानंतरच विमानतळाबाहेर पाठविण्यात येत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी बैठकीत निर्णय घेत १३ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत विदेशी व्हिसा रद्द केला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून केवळ भारतीय प्रवासी विदेशातून भारतात दाखल होणार आहेत. विदेशातून नागपुरात येणाऱ्या प्रवाशांवर आमचे लक्ष असून सर्वांची स्कॅनिंग करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तपासणीसाठी विमानतळावर डॉक्टरांची चमू तैनात
नागपूर विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांची चमू ६ मार्चच्या सकाळपासूनच तैनात आहे. सर्वांची थर्मल स्कॅनिंगने तपासणी करण्यात येत आहे. संशयित प्रवाशाला शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येत आहे. विदेशी प्रवाशांची दिल्ली, मुंबई वा अन्य विमानतळांवर तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतरच ते नागपुरात दाखल होत आहेत.
एम. ए. आबीद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल.