coronavirus: नागपुरात कोविशिल्ड दिलेल्या स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 05:07 AM2020-10-31T05:07:10+5:302020-10-31T07:30:39+5:30
corona vaccine news : पहिला डोस दिलेल्या सर्व स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कुणालाच कशाचा त्रास नाही. आता दुसरा डोस २८ दिवसांनी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी दिला जाणार आहे.
नागपूर : कोरोना प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या ५० स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम असल्याचे ‘कोविशिल्ड’ चाचणीचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांनी सांगितले. स्वयंसेवकांमध्ये २० महिला व ३० पुरुषांचा सहभाग आहे.
या चाचणीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) २३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. चाचणीला शुक्रवारी आठवडा पूर्ण झाला. याबाबत डॉ. मेश्राम म्हणाले की, पहिला डोस दिलेल्या सर्व स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कुणालाच कशाचा त्रास नाही. आता दुसरा डोस २८ दिवसांनी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी दिला जाणार आहे. त्यानंतर ५६व्या दिवशी रक्ताची तपासणी करण्यात येईल. ९०व्या दिवशी त्यांची फोनवरून प्रकृतीविषयी चौकशी केली जाईल आणि १८०व्या दिवशी त्यांची पुन्हा हॉस्पिटलमध्ये रक्ताची तपासणी केली जाईल.