नागपूर जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थिनीला कोरोनाची लागण; शाळा एक आठवडा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 09:02 PM2021-12-17T21:02:15+5:302021-12-17T21:02:44+5:30
Nagpur News कामठी तालुक्यातील खैरी येथील एका शाळेच्या दहाव्या वर्गाचा विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली. या विद्यार्थिनीने गुरुवारी शाळेत परीक्षा दिली आणि शुक्रवारी तिचा ‘आरटीपीसीआर’चा अहवाल पॉझिटिव्ह आला.
नागपूर : कामठी तालुक्यातील खैरी येथील एका शाळेच्या दहाव्या वर्गाचा विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, या विद्यार्थिनीने गुरुवारी शाळेत परीक्षा दिली आणि शुक्रवारी तिचा ‘आरटीपीसीआर’चा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांचीही तपासणी केली जाणार आहे. आज नागपूर जिल्ह्यात आठ नव्या रुग्णांची भर पडली.
कोरोनाच्या पावणेदोन वर्षाच्या कालावधीनंतर शहरातील पहिली ते सातव्या वर्गाची शाळा बुधवारपासून सुरू झाल्या. विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना शुक्रवारी कामठी मार्गावरील दिल्ली पब्लिक स्कूलमधील १५ वर्षीय विद्यार्थिनीला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थिनीच्या वडिलांचा अहवालही आज कोरोना पॉझिटिव्ह आला. वडिलांचा कोलकात्ता प्रवासाचा इतिहास आहे. या दोघांनाही सौम्य लक्षणे असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
संपर्कातील विद्यार्थ्यांची तपासणी
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, कोरोनाबाधित विद्यार्थिनीने १६ डिसेंबर रोजी शाळेत दहावीची परीक्षा दिली. १७ डिसेंबर रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची, शिक्षक व कर्मचाऱ्यांचीहीसुद्धा तपासणी केली जाईल. खबरदारी म्हणून या विद्यार्थिनीचे नमुने जनुकीय चाचणीसाठी (जिनोम सिक्वेंसिंग) पाठविण्यात येतील.
शाळा व परिसराचे निर्जंतुकीकरण
दिल्ली पब्लिक स्कूल व्यवस्थापनाने पाठविलेल्या एका पत्रानुसार, १७ डिसेंबरपासून एक आठवडा शाळा बंद राहणार आहे. शाळा व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थिनीच्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहनही केले आहे.
शहरातील सात तर जिल्हाबाहेरील एक रुग्ण पॉझिटिव्ह
नागपूर जिल्ह्यात मागील २४ तासात ३,६४९ चाचण्या झाल्या. यातील शहरात झालेल्या २,८५५ चाचण्यामधून सात रुग्ण पॉझिटिव्ह आले. ग्रामीणमध्ये झालेल्या ७९४ चाचण्यांमधून एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही. मात्र जिल्हाबाहेरील एक रुग्ण बाधित आढळून आला. विशेष म्हणजे, आज १८ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत ४,८३,५६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या कोरोनाचे ५४ रुग्ण सक्रिय आहेत.