CoronaVirus News in Nagpur : नागपुरात आणखी पाच कोरोनाचे रुग्ण, संख्या पोहोचली १४३ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 09:32 PM2020-05-01T21:32:22+5:302020-05-01T22:29:07+5:30
CoronaVirus Latest Marathi News in Nagpur: कॉटन रोड तहसील वरूड, अमरावती येथील ४५वर्षीय महिलेला तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये पाठविले.
नागपूर : अमरावती वरूड येथून नागपुरातील मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेली महिला रुग्णाचा नमुने पॉझिटिव्ह आला. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या रुग्णासह ‘एम्स’ प्रयोगशाळेत चार असे एकूण पाच रुग्णांची नोंद झाली. नागपुरात आज रुग्णाची संख्या १४३ झाली आहे. मेडिकलमधून आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.
कॉटन रोड तहसील वरूड, अमरावती येथील ४५वर्षीय महिलेला तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये पाठविले. २९ एप्रिल रोजी पहाटे २.३०वाजता रुग्ण मेडिकलमध्ये पोहचला. ताप, सर्दी, खोकल्यासह श्वास घेणे कठीण जात असल्याची लक्षणे आहेत. त्याच दिवशी नमुना घेऊन मेडिकलच्या प्रयोगशाळेत पाठविले असता, आज नमुनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या महिलेची प्रवासाची पार्श्वभूमी नाही. या शिवाय कोणत्या पॉझिटिव्ह रुग्णाचाही संपर्कात आले नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकाकडून सांगण्यात येते. ‘एम्स’च्या प्रयोगशाळेत चार नमुने पॉझिटिव्ह आले. परंतु त्यांचे वय व वसाहतींची माहिती सामोर आलेली नाही.
२८ व ३३वर्षीय रुग्णाने केली कोरोनावर मात
शांतीनगर येथील २८वर्षीय महिलेचा व कामठी रोड येथील ३३वर्षीय पुरुषाचा नमुना १९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला होता. दोघांनाही मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. १४ दिवसानंतर २४ तासांच्या अंतराने तपासण्यात आलेले दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने दोघांनाही आज मेडिकलमधून सुटी देण्यात आली. पुढील १४ दिवस त्यांना होम क्वारंटाइन रहावे लागणार आहे. नागपुरात आतापर्यंत ४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.