Coronavirus in Maharashtra : कारागृहात कोरोनाचा भडका! तुरुंग रक्षकासह आठ कैदी कोरोनाग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 03:43 PM2021-04-11T15:43:22+5:302021-04-11T15:45:15+5:30
Coronavirus in Maharashtra : जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत यातील कैद्यांपैकी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह २२ जणांना कोरोणाची बाधा झाली होती आणि ते सर्वच्या सर्व बरेही झाले होते.
नागपूर : येथील मध्यवर्ती कारागृहात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. सद्यस्थितीत एका तुरुंग रक्षकासह नऊ जण कोरोनाग्रस्त झाले आहेत. येथील मध्यवर्ती कारागृहात आजच्या घडीला २२०० वर कैदी आहेत. जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत यातील कैद्यांपैकी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह २२ जणांना कोरोणाची बाधा झाली होती आणि ते सर्वच्या सर्व बरेही झाले होते.
आता गुरुवारपासून पुन्हा काही कैद्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येऊ लागली आहे. शुक्रवारी त्यातील एका कैद्याला मेडिकलमध्ये नेले असता तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला मेडिकलमध्येच दाखल करण्यात आले.शनिवारी रात्रीपासून पुन्हा आठ जणांमध्ये कोरोणाची लक्षणे तीव्रतेने दिसून आली. या सर्वांना रविवारी दुपारी तपासणीसाठी मेडिकलमध्ये नेण्यात आले. सर्वांचे सिटी स्कॅन करून घेण्यात आले. त्यातून एका तुरुंग रक्षकासह आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याचे समजते. कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी एक कैदी मेडिकलमध्ये भरती करण्यात आला. तर आज कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यामुळे एका तुरुंग रक्षकाला गृह विलगीनीकरण करण्यात आले. अन्य सात जणांना मेडिकलमध्ये ठेवायचे की त्यांच्यावर कारागृहातील इस्पितळात उपचार करायचे. याबाबत चर्चा सुरू होती.