CoronaVirus in Nagpur : नागपुरात ४४ व्या दिवशी १०० वा रुग्ण : उपाययोजनांचा प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:19 PM2020-04-24T23:19:23+5:302020-04-24T23:20:13+5:30
अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेला बजाजनगर येथील पहिला रुग्ण ११ मार्च रोजी पॉझिटिव्ह आला. तब्बल ४४ दिवसानंतर १०० व्या रुग्णाची आज शुक्रवारी नोंद झाली. विशेष म्हणजे, मुंबईत शंभरी गाठायला २१, नाशिकमध्ये २२ तर पुण्यात २४ दिवस लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेला बजाजनगर येथील पहिला रुग्ण ११ मार्च रोजी पॉझिटिव्ह आला. तब्बल ४४ दिवसानंतर १०० व्या रुग्णाची आज शुक्रवारी नोंद झाली. विशेष म्हणजे, मुंबईत शंभरी गाठायला २१, नाशिकमध्ये २२ तर पुण्यात २४ दिवस लागले. त्या तुलनेत नागपुरात दुप्पट दिवस लागले. नागपुरात नोंद झालेल्या पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाकडून त्याची पत्नी, त्याच्यासोबत अमेरिकेला प्रवासाला असलेले त्याचे दोन सहकारी पॉझिटिव्ह आले. परंतु त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले. यामुळे पहिली साखळी येथेच खंडित झाली. त्यानंतर २६ मार्च रोजी दुसरा बाधित रुग्ण आढळून आला. या रुग्णाची दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी होती. या रुग्णाकडून त्याची आई, पत्नी, मुलगा, त्याच्या दुकानातील व्यवस्थापक, व्यवस्थापकाची मुलगी, दुकानातील कर्मचारी, बाधित रुग्णाचा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलगा असे एकूण ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे नमुने तपासण्यात आले असता सर्व निगेटिव्ह आले. ३० मार्च रोजी दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेला आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. याच्या संपर्कात आलेले ३४ नमुने तपासण्यात आले असता सर्व नमुने निगेटिव्ह आले. यामुळे लागण झालेल्याची साखळी खंडित झाली होती. परंतु ४ एप्रिल रोजी कोरोना संशयित ६८ वर्षीय मृताचे नमुने ६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या रुग्णापासून व त्यांच्या नातेवाईकापासून तर मोमीनपुऱ्यातील एका बाधित रुग्णांपासून एप्रिल महिन्यात रुग्णांची संख्या ८८ वर पोहचली. यातील ८६ रुग्णांना आधीपासूनच क्वारंटाईन करून ठेवण्यात आल्याने संसर्गाचे प्रमाण कमी राहिले. परिणामी, शंभरी गाठण्यातही नागपूरला ४४ दिवस लागले हे शासनाचे यश आहे. मुंबईत पहिल्या रुग्णाची नोंद ११ मार्च रोजी झाली. २१ दिवसाने म्हणजे ३१ मार्चला १०० व्या रुग्णाची नोंद झाली. पुण्यात पहिल्या रुग्णाची नोंद ९ मार्च रोजी झाली. २४ दिवसाने म्हणजे १ एप्रिल रोजी १०० वा रुग्ण दिसून आला. नाशिकमध्ये पहिल्या रुग्णाची नोंद २९ मार्च रोजी झाली.
२२ दिवसाने म्हणजे १९ एप्रिल रोजी १०० व्या रुग्णाची नोंद झाली. विशेष म्हणजे, मुंबई व नागपुरात एकाच दिवशी रुग्णाची नोंद झाली असली तरी मुंबईला शंभरी गाठायला २१ तर नागपूरला ४४ दिवस लागले. लोकांनी शासनाला व आरोग्य यंत्रणेला आणखी सहकार्य केल्यास नागपुरातील स्थिती सामान्य होऊ शकेल, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञानी व्यक्त केला आहे.
राज्यातील कोरोनाची शंभरी
शहर पहिला रुग्ण शंभरी रुग्ण
मुंबई ११ मार्च ३१ मार्च
पुणे ९ मार्च १ एप्रिल
नाशिक २९ मार्च १९ एप्रिल
नागपूर ११ मार्च २४ एप्रिल