CoronaVirus in Nagpur : अजनीत तयार झाले १,१५० लिटर सॅनिटायझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 10:05 PM2020-04-03T22:05:02+5:302020-04-03T22:06:18+5:30
नागपूर विभागात ३ हजार मास्क आणि १,१५० लिटर सॅनिटायझर तयार करण्यात आले आहे. हे काम अजनीच्या लोकोशेडमध्ये करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वजण पुढाकार घेत आहेत. यात भारतीय रेल्वेही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मालगाड्या, पार्सल रेल्वेगाड्यांमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू आहे. यासोबतच मास्क आणि सॅनिटायझर तयार करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पुढाकार घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकुण १८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या स्थितीत कामावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने मास्क आणि सॅनिटायझर तयार करणे सुरू केले आहे. नागपूर विभागात अजनी परिसरात याचे काम सुरू आहे. कोरोनामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे झोनमधील कारखान्यात सॅनिटायझर तयार करणे सुरू करण्यात आले आहे. सोबतच जे कर्मचारी घरी बसून काम करीत आहेत किंवा ज्या महिलांना सुटी देण्यात आली आहे त्या मास्क तयार करण्याचे काम करीत आहेत. नागपूर विभागात ३ हजार मास्क आणि १,१५० लिटर सॅनिटायझर तयार करण्यात आले आहे. हे काम अजनीच्या लोकोशेडमध्ये करण्यात येत आहे. सॅनिटायझर तयार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहिती आणि फॉर्म्युल्याचा वापर करण्यात येत आहे. सॅनिटायझर आणि मास्कचे वितरण रेल्वे कर्मचाऱ्यांना करण्यात येणार असून ते अधिक झाल्यास बाहेरही त्याचे वितरण होऊ शकते.
बाहेर वितरण करण्यासाठी प्रयत्न करू
‘रेल्वेतील महिला कर्मचारी मास्क तयार करीत आहेत. अजनीच्या लोकोशेडमध्ये मास्क तयार करण्यात येत आहेत. तयार करण्यात आलेले मास्क, सॅनिटायझर रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. उत्पादन अधिक झाल्यास ते बाहेर वितरित करण्याबाबत विचार करण्यात येईल.’
एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग