CoronaVirus in Nagpur : नागपुरात १३ पॉझिटिव्ह,एक मृत्यू : मृत्यूची संख्या ९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:21 PM2020-05-27T23:21:24+5:302020-05-27T23:24:24+5:30
एकीकडे लॉकडाऊन शिथिल झाल्याने रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येने जोर पकडला आहे. बुधवारी १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नागपुरात रुग्णांची संख्या ४४६ वर पोहचली असून मृतांची संख्या नऊ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे लॉकडाऊन शिथिल झाल्याने रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येने जोर पकडला आहे. बुधवारी १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नागपुरात रुग्णांची संख्या ४४६ वर पोहचली असून मृतांची संख्या नऊ झाली आहे. सतरंजीपुरा येथील ७१ वर्षीय महिलेची प्रकृती गेल्या काही दिवसापासून खालावली होती. परंतु घरीच उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री तिला मेयोत दाखल केले. परंतु घरीच तिचा मृत्यू झाला होता. रेड झोनमधील रुग्ण असल्याने तिचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. सतरंजीपुरा वसहतीतील हा दुसरा मृत्यू आहे. नागपुरातील पहिला मृत्यू याच वसाहतीत झाल्यावर १०० वर रुग्ण पॉझिटिव्ह आले तर दीड हजारावर संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, मंगळवारी १४ दिवस पूर्ण झालेल्या याच वसाहतीतील अनेक संशयितांना क्वारंटाईन सेंटरमधून सोडण्यात आले. आता पुन्हा घरीच मृत्यू झाल्याने पुन्हा या भागातील लोकांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या महिन्यातील हा चौथा मृत्यू आहे. या शिवाय, नाईक तलाव, बांगलादेश, मोमीनपरा, सतरंजीपुरा, कामठी, सावनेर, हावरापेठ व हंसापुरी येथेही रुग्णांची नोंद झाली.
नाईक तलाव, बांगलादेश कोरोनाच्या नव्या वसाहती
गेल्या अडीच महिन्यात आतापर्यंत ४५ वसाहतींमध्ये कोरोनाचे रुग्ण दिसून आले. यात मोमीनपुरा व सतरंजीपुरा येथे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. परंतु आता जसजसे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तसतसे नव्या वसाहतींमध्ये रुग्ण आढळून येत आहे. मेयोच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यामध्ये गजबजलेली वसाहत असलेल्या नाईक तलाव व बांगलादेश येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. या शिवाय मोमीनपुरा येथून तीन रुग्णांची नोंद झाली आहे. यातील एक गर्भवती आहे.
हावरापेठ येथे पुन्हा दोन रुग्ण
हावरापेठ ओंकारनगर येथून मंगळवारी ५२ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला. आज त्याची ५१वर्षीय पत्नी आणि २३ वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह आला. त्यांचे नमुने एम्समध्ये तपासण्यात आले. या दोघांनाही एम्समध्ये दाखल करण्यात आले. सध्या एम्समध्ये सात रुग्ण उपचार घेत आहेत.
कामठीत तीन तर सावनेरमधील एक पॉझिटिव्ह
मुंबई येथून कामठीत आपल्या स्वगृही परतलेले पती, पत्नी आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलाचे नमुने एम्समध्ये पॉझिटिव्ह आले. कामठीत आता रुग्णांची संख्या पाच झाली आहे. शिवाय सावनेरमध्ये पहिल्यांदाच रुग्ण आढळून आला. हा रुग्णही मुंबई येथून आल्याचे बोलले जाते. मेयोच्या प्रयोगशाळेत या रुग्णाची चाचणी झाली. सतरंजीपुरा आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले बहुसंख्य रुग्ण रुग्णालयातून घरी परतले. मात्र त्यानंतरही रुग्णांची संख्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज याच वसाहतीतील एक मृत्यू व एका रुग्णाची नोंद झाली आहे. हंसापुरीतही रुग्ण वाढताना दिसूून येत आहे. आज पुन्हा एका रुग्णाची नोंद झाल्याने या वसाहतीतील रुग्णांची संख्या पाच झाली आहे.
नऊ महिन्याच्या मुलाचा मृत्यू
मेळघाट येथील भुतरुंग गावातील नऊ महिन्याच्या मुलाचा आज मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या रुग्णाला गेल्या काही दिवसापासून सर्दी, खोकला व ताप होता. मेडिकलमध्ये याची तपासणी केली असता त्याला ‘सारी’ म्हणजे ‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’चे निदान झाले. आतापर्यंत दोन वर्षाच्या आतील रुग्णाचा हा दुसरा मृत्यू आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १३४
दैनिक तपासणी नमुने १७९
दैनिक निगेटिव्ह नमुने १६६
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ४४६
नागपुरातील मृत्यू ०९
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३५६
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २५३३
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १६८७
पीडित-४४६-दुरुस्त-३५६-मृत्यू-९