CoronaVirus in Nagpur : नागपुरातील १३६२ रुग्ण कोरोनामुक्त : बरे होण्याचे प्रमाण ८३.१८ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 01:17 AM2020-09-23T01:17:09+5:302020-09-23T01:18:28+5:30
जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक राहिली. मंगळवारी १६६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, १२७३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक राहिली. मंगळवारी १६६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, १२७३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तसेच, कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ८३.१८ टक्के झाले. देशामध्ये हे प्रमाण ८०.८६ टक्के आहे. नागपूरचे प्रमाण २.३२ टक्के अधिक असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एवढेच नाही तर नागपूरमधील हे आतापर्यंतचे सर्वाधिक प्रमाण आहे. जूनमध्ये बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यापर्यंत पोहचले होते.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये १३६२ रुग्ण शहरातील तर, ३०० रुग्ण ग्रामीणमधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार २१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात शहरातील ४५ हजार ३७७ तर, ग्रामीणमधील ९८३५ रुग्णांचा समावेश आहे. सध्या कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी होत आहे. जिल्ह्यात सध्या ९०१८ (शहर-५७८२, ग्रामीण-३२३६) कोरोना रुग्ण आहेत. त्यात ३७९८ गृह विलगीकरणातील रुग्ण आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ९२५, ग्रामीणमधील ३४० तर, इतर भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ६६ हजार ३८० कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी ५३२७ (शहर-३४४५, ग्रामीण-१८८२) नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत एकूण ४ लाख ७ हजार ८६ नमुने तपासण्यात आले.
५४ रुग्णांचा मृत्यू
मंगळवारी कोरोनामुळे ५४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील ४१, ग्रामीणमधील ५ तर, इतर ठिकाणच्या ८ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत २१५० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन मृत्यूसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत ११०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
खासगी प्रयोगशाळेत ३५६ पॉझिटिव्ह
खासगी प्रयोगशाळेत तपासलेल्या ९१४ मधून ३५६ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. अॅन्टीजेन चाचणीत ३८२० मधील २६५ नमुने पॉझिटिव्ह मिळाले. तसेच, एम्समध्ये १२८, मेडिकलमध्ये १९६, मेयोमध्ये १८३, माफसूमध्ये १०१ तर, नीरीमध्ये ४४ नमुने पॉझिटिव्ह मिळून आले.
अॅक्टिव - ९०१८
स्वस्थ - ५५२१२
मृत्यू - २१५०