CoronaVirus in nagpur : नागपुरात बाधित मृताकडून १४ जणांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 08:15 PM2020-04-13T20:15:08+5:302020-04-13T20:17:13+5:30
कोरोना विषाणूची लागण झालेल्या मृताच्या व त्याच्या नातेवाईकाच्या संपर्कात आलेल्यांचा आकडा वाढतच चालला आहे. रविवारी ही संख्या १४ वर गेली. बाधितांकडून संसर्ग झालेला हा आकडा आतापर्यंत नोंद झालेल्यांमध्ये सर्वाधिक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूची लागण झालेल्या मृताच्या व त्याच्या नातेवाईकाच्या संपर्कात आलेल्यांचा आकडा वाढतच चालला आहे. रविवारी ही संख्या १४ वर गेली. बाधितांकडून संसर्ग झालेला हा आकडा आतापर्यंत नोंद झालेल्यांमध्ये सर्वाधिक आहे. आरोग्य यंत्रणेला शेवटच्या संशयितापर्यंत पोहचणे तूर्तास कठीण असले तरी संपर्कातील लोकांंनी सामोर येऊन प्रशासनाला मदत केल्यास हे सहज शक्य आहे. सतरंजीपुरा ही गजबजलेली वसाहत. याच वसाहतीत एका ६८ वर्षीय पुरुष रुग्णाला दोन आठवड्यापासून पोटाचा त्रास होता. त्याने वस्तीतीलच एका रुग्णालयातून औषधेही घेतली. परंतु आजार बरा होत नसल्याचे पाहत ४ एप्रिल रोजी मेयोमध्ये तपासणी केली असता रुग्णाला भरती करून घेण्यात आले. परंतु दुसऱ्याच दिवशी ५ एप्रिल रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६ एप्रिल रोजी त्यांचे नमुने निगेटिव्ह आले. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबांपासून ते शेजाऱ्यापर्यंत अशा १४ लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे.
अशी वाढत गेली संसर्गाची साखळी मृतापासून त्याचा मुलगा, मुलाची पत्नी, मृताची एक अविवाहित मुलगी, विधवा मुलगी व दोन विवाहित मुलगी, एका विवाहित मुलीकडून पती आणि मुलगा व मुलगी तर दुसऱ्या विवाहित मुलीकडून मुलगा व मुलगी, मृताच्या भावाचा मुलाचा मुलगा, शेजारी व आणखी एक जवळच्या संपर्कातील पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे, मृताची परदेशी प्रवासाची पार्श्वभूमी नाही.